NCP National Executive reshuffle rumors : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी समोर आली आहे. या यादीतून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील आदी दिग्गज नेत्यांची नावे हटवण्यात आली आहेत. या यादीत त्यांना स्थान देण्यात न आल्याने पक्षात अतंर्गत कलह असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातीव वादाची ही परिणती असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या चर्चांना जोर येत असतानाच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री एक्स पोस्ट करून महत्त्वाची माहिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर एक पत्रक व्हायरल झालं आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी असून ही यादी निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव असून पार्थ आणि जय पवार यांचा जनरल सेक्रेटरी म्हणून उल्लेख आहे. मात्र, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नावे वगळण्यात आली आहेत. दरम्यान, हे पत्रक व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खुलासा केला आहे. त्यांनी मध्यरात्री याबाबत पोस्ट केली.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली कार्यकारिणीच्या यादीत चुका असून लवकरच त्यात दुरुस्ती करण्यात येईल, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यामुळे पक्षात नेतृ्त्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाचीही धुरा सांभाळली आणि उपमुख्यमंत्री पदाचीही शपथ घेतली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतृत्त्वाबाबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी नेत्यांवर आरोप करण्यात येत होते. या नेत्यांकडून पक्ष ताब्यात घेण्यात येत असल्याचा दावा पक्षाबाहेरून करण्यात येत होता. त्यातच ही यादी जाहीर झाल्याने राजकीय चर्चांना वेग आला.
तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील संघर्ष विकोपास गेल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती, बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे तटकरे यांनी सांगितले.
