scorecardresearch

‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना नवाब मलिकांच्या मुलीने दिलं उत्तर; म्हणाल्या….

फडणवीस आणि नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडूनदेखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत

NCP, Nawab Malik, Nilofer Malik Khan, BJP, Devendra Fadanvis, Amruta Fadanvis, निलोफर मलिक खान, अमृता फडणवीस, नवाब मलिक, देवेंद्र फडणवीस
फडणवीस आणि नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडूनदेखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत

देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे अमली पदार्थ कारावाई प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिकांनी केला होता. तसंच मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता. जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी आता फडणवीस आणि नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडूनदेखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

“जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”; अमृता फडणवीसांची कवितेच्या माध्यमातून टीका

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत नवाब मलिका यांच्या टीकेला कवितेतून उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खानने उत्तर दिलं आहे. जर काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील असा इशाराच त्यांनी दिला आहे.

अमृता फडणवीसांचं ट्वीट काय –

“बिघडलेल्या नवाबांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतल्या. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!,” असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

निलोफर मलिक खान यांचं उत्तर –

“जर आपल्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर त्यांना पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा तिथे भीती नसते. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे,” असं उत्तर निलोफर यांनी अमृता फडणवीसांच्या ट्वीटला दिलं आहे.

याआधी नवाब मलिकांवर हल्लाबोल करताना अमृता फडणवीसांनी ‘पुरुष असाल तर माझ्यामार्फत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका,’ असे म्हटले होते.

नवाब मलिकांनी जयदीप राणासोबत फोटो ट्विट केल्यानंतर अमृता फडणवीसांनी टीका करताना म्हटलं होतं की, “माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुम्ही जे आरोप करत आहात त्याबद्दल मी परत एकदा सागंते की, आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत, आमची वेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ती, बँकर आणि गायिका आहे. मी माझी ही ओळख जपली आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्याला देखील नाही सोडत. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय, आमच्याकडे असं काहीच नाही जे ते उघड करू शकतात. आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असं काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 13:31 IST