राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. रोज नवनवे खुलासे करणाऱ्या नवाब मलिक यांनी यावेळी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूपत्राचे दाखले शेअर केले आहेत. यामधील एका दाखल्यात हिंदू तर दुसऱ्यात मुस्लिम असा उल्लेख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाब मलिक यांनी ट्वीट केलं असून यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्या आई झहेदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मृत्यूचे दाखले शेअर केले आहेत. १६ एप्रिल २०१५ रोजी झहेदा यांचं निधन झाल्याचा उल्लेख या दाखल्यात आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी यावेळी या दोन्ही दाखल्यांवर उल्लेख असलेल्या धर्माकडे लक्ष वेधलं आहे. एका दाखल्यावर मुस्लिम असा उल्लेख असून दुसऱ्या दाखल्यात हिंदू असा उल्लेक आहे.

“अजून एक फर्जीवाड़ा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत ज्ञानदेव वानखेडे,” असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

याआधी नवाब मलिक यांनी दोन व्यक्तींचा फोटो ट्विट करत हा फोटो निकाहच्या वेळच्या असल्याचा दावा केला होता. “कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, अशा कॅप्शनसहीत मलिक यांनी हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये डावकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती मुस्लीम धर्मगुरु असून फोटोत दिसणारे वानखेडे हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. फोटोमध्ये जी व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय तिने मुस्लीम बांधव घालतात त्याप्रमाणे डोक्यावर गोल टोपी घातल्याचं दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलिक यांनी वानखेडे यांचा वाशीमध्ये एक बार असल्याचा दावा केला होता. वानखेडे यांच्या नावे या बारचा परवाना असल्याचं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik tweet death certificate ncb sameer wankhede mother hindu muslim sgy
First published on: 25-11-2021 at 09:36 IST