मराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा देत म्हणाले…

“सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही”

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे विरोधक ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही सरकारकडे केली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

“मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी विनंती आहे,” असं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही”.

“मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसंच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र,” असंही ते म्हणाले आहेत.

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक असं या तरुणाचं नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने मराठा आरक्षण रद्द झाल्याने टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp parth pawar tweet on beed suicide maratha reservation supreme court sgy

ताज्या बातम्या