कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. देशमुखांना मिळालेल्या जामिनानंतर राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रावादी काँग्रेस प्रवक्ते महेश तापसे यांनी याबाबत बोलताना “हा सत्याचा विजय” असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर

नेमकं काय म्हणाले महेश तापसे?

“आज अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. आम्ही सुरुवातीपासून हेच म्हणत होतो की, अनिल देशमुखांवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे आरोप राजकीय आरोप होते. अखेर आज न्यायदेवतेने न्याय करत अनिल देशमुख यांना जामीन दिला आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया महेश तापसे यांनी दिली आहे.

हेही वाचा – दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना पॅकेज ते पोलिसांना घरांसाठी कर्ज, मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे सहा निर्णय

“गेल्या ११ महिन्यांपासून अनिल देशमुख यांना त्रास दिला जात होता. यात पूर्णपणे भाजपाचा हात होता. ज्यांनी आरोप केले ते कोणताच पुरावा सादर करू शकले नाहीत. मात्र, आज अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच या प्रकरणातून त्यांची लवकरच निर्दोष मुक्तता होईल”, असेही ते म्हणाले.