राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर सोमवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या कडवट टीकेमुळे आता चेंडू  पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला असून या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून काय भूमिका घेतली जाते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.  
दरम्यान या मेळाव्यामुळे  राष्ट्रवादीमध्ये उफाळून आलेली गटबाजीची किंमत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोजावी लागेल, असे स्पष्टपणे दिसत आहे.
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव विरुद्ध पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, माजी आमदार कदम अशी गटबाजी पूर्वीपासून असून शेजारच्या रायगड जिल्ह्य़ातील ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे यांचाही त्यांना आशीर्वाद राहिला आहे. सोमवारी कदम यांच्या मेळाव्यात यापैकी निकम यांनी उपस्थित राहून संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासन दिले. ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ‘धाकटय़ा’ साहेबांच्या भूमिकेबाबतही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जिल्ह्य़ातील पक्षसंघटनेत दुफळीचे चित्र चव्हाटय़ावर आले आहे.
दुसरीकडे, कदम यांनी पूर्वीच पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी अजून तो स्वीकारण्यात आलेला नाही. दरम्यान प्रदेशाध्यक्ष जाधव यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण कदम यांनी मेळाव्यात जाधवांवर केलेली टीका अप्रत्यक्षपणे पक्षश्रेष्ठींच्या निवडीवरही असल्यामुळे आता श्रेष्ठींनीच याबाबत निर्णय घ्यावा, अशी जाधव समर्थकांची मागणी आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील गुहागर (भास्कर जाधव) आणि रत्नागिरी विधानसभेच्या जागा (उदय सामंत) राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तसेच चिपळूण मतदारसंघातून शेखर निकम उत्सुक आहेत. सोमवारच्या मेळाव्यातील भाषणे आणि भूमिका लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण आगामी काळात जास्तच चिघळणार, हे उघड आहे.अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्य़ातील या कलगी-तुऱ्याची मजा बघत बसण्याची परंपरागत भूमिका कायम ठेवणे धोकादायक ठरू शकते.