“मविआ सरकारच्या काळात सुरु केलेली शिवभोजन थाळी आताचे ईडी सरकार अर्थात शिंदे-फडणवीस सरकार बंद करणार आहे. महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त सामान्य माणसाला राज्य सरकारने आणखी त्रासात ढकलून गोरगरीब मराठी माणसांच्या पोटावर लाथ मारू नये. मात्र, सरकारने पोटावर लाथ मारली तर सामान्य जनता यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केली. त्यांनी बुधवारी (२८ सप्टेंबर) निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली.

रविकांत वरपे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन थाळी ही महत्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली. केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. मविआ सरकारच्या काळात सुरू केलेली शिवभोजन थाळी ही आताचे ईडी अर्थात शिंदे – फडणवीस सरकार बंद करणार आहे. महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त सामान्य माणसाला राज्य सरकारने आणखी त्रासात ढकलून गोरगरीब मराठी माणसांच्या पोटावर लाथ मारू नये. असे केले, तर सामान्य जनता यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.”

“शिवभोजन थाळीमुळे नागरिकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटला”

“शिवभोजन थाळीने करोना काळात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या, रोजीरोटीची कामे बंद पडलेल्या कित्येक गरीब व गरजू जनतेला माफक दरात अन्न देण्याचं पुण्य केलं. संकट काळात आधार दिला. करोना काळात हाताला काम नसलेला एक मोठा कामगार वर्ग आहे. अशा गरजू कुटुंबासाठी ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजुर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न शिवभोजन थाळीच्या माध्यमातून सुटला,” असे मत रविकांत परवे यांनी व्यक्त केले.

“शिवभोजन थाळीचे जवळपास २००० केंद्रं सुरू”

वरपे पुढे म्हणाले, “करोना काळातील अनेक जणांचे रोजगार गेले, छोटे-मोठे उद्योग बंद पडले, कोणाच्याही हाताला यावेळी काम नव्हते. महागाई सुद्धा वाढत आहे. त्यामुळे गोरगरीब, कष्टकरी जनतेला माफक दरात पोटभर जेवण जेवायला मिळावं या हेतूने महाविकास आघाडी सरकारच्या संकल्पनेतून ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. शिवभोजन थाळीचे जवळपास २००० केंद्रं सुरू केले. ५ ते १० रुपयांमध्ये पूर्ण जेवण गोरगरिबांसाठी सुरू केले आणि लोकांनीही या थाळीला प्रचंड प्रतिसाद दिला.
या शिवभोजन थाळीचा सुमारे ९ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे.”

“या गद्दार सरकारला मविआ सरकारची कावीळ”

“१० रुपयात शुद्ध पोटभर जेवण देण्याचा हा निर्णय करोना संकटात लाखो निराश्रित नागरिकांच्या पोटाचा आधार ठरला होता. पण खोके खाऊन ओक्के झालेल्या या गद्दार सरकारला मविआ सरकारची कावीळ झालीय. म्हणूनच मविआ सरकारने घेतलेल्या अनेक लोकाभिमुख निर्णयांना या सरकारने एकतर स्थिगिती दिली किंवा ते रद्द केले आहेत,” असा आरोप वरपेंनी केला.

“दुसऱ्यांची कामे पुसून तुम्ही कोणता पराक्रम करताय?”

“मेट्रो कारशेड कांजूरला हलवणे, आरेमध्ये कारशेडच्या कामावर घातलेली बंदी किंवा आताचा शिवभोजन थाळी, जे निर्णय लोकांच्या पसंतीस आले होते, ते सर्व निर्णय या खोके सरकारने रद्द करण्याचा किंवा विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला. दुसऱ्याची रेष छोटी दाखवण्यासाठी आपली रेष मोठी ओढायची असते, दुसऱ्यांची कामे पुसून तुम्ही कोणता पराक्रम करताय?”, असा सवालही वर्पे यांनी केला.

हेही वाचा : मधुकर पिचडांच्या सत्तेला २८ वर्षानंतर राष्ट्रवादीने लावला सुरुंग; अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत सत्तांतर

“तुम्ही कितीही द्वेषाने वागला तरी ह्यात नुकसान महाराष्ट्राचे होत आहे, हे या गद्दार ईडी सरकारला कळत नाही. पण जनता यांना यांची जागा नक्कीच दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,” असे रविकांत वर्पे यांनी म्हटले.