राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आधी मंत्रीमंडळ विस्तार, त्यानंतर खातेवाटप आणि मग पालकमंत्र्यांच्या नावांची जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सातत्याने पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्याची मागणी लावून धरल्यानंतर अखेर सरकारने शनिवारी संध्याकाळी पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भातील सहा जिल्ह्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी संध्याकाळी जाहीर केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय…

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया

चंद्रकांत दादा पाटील – पुणे

विजयकुमार गावित- नंदुरबार

गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे – सांगली

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत – रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार – हिंगोली

दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

असे इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. मुंबई महानगर पालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मुंबई उपनगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.तर मुंबई शहरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…

दरम्यान, यामध्ये सर्वाधिक सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे. ‘आधी म्हटले, मी सरकार सामील होणार नाही. नंतर उपमुख्यमंत्री झाले. नंतर गृहमंत्रीपदासह ८ ते ९ खात्यांचे मंत्री झाले आणि आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री! मी सरकारमध्ये सामील होणार नाही’, अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी टोला लगावला आहे.

संजय शिरसाट, बच्चू कडूंना खोचक शुभेच्छा!

देवेंद्र फडणवीसांना सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळाल्यासोबतच आमदार संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना एकही पालकमंत्रीपद न मिळाल्यावरूनही वरपे यांनी खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे. ‘संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. ५० खोके! एकदम ओके!’ असं आपल्या ट्वीटमध्ये रविकांत वरपे म्हणाले आहेत.

अजित पवारांचा टोला

दरम्यान, अजित पवारांनीही देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. “माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ येत होतं. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं अजित पवार एका कार्यक्रमात म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ravikant varpe mocks devendra fadnavis bachchu kadu pmw
First published on: 25-09-2022 at 17:00 IST