आता माझं वय २३ आहे, २५ होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व स्वर्गीय नेते आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे. याठिकाणी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस यांची शेतकरी विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात मैदानात आहे.
कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक सध्या पार पडत असून यानिमित्ताने प्रचाराची सुरुवात झाली आहे. या निवडणुकीतून रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवत आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्तेचे वाटेकरी असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपाशी आघाडी केल्याने याठिकाणी ते एकमेकांच्या विरोधात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाची शेतकरी विकास आघाडी अशी लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा शुभारंभ बुधवारी पार पडला. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ शहरातून भव्य अशी प्रचार पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर आयोजित प्रचारसभेमध्ये अनेक नेत्यांनी २५ वर्षाच्या तरुणाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत असं म्हटलं.
यानंतर रोहित पाटील यांनी हाच मुद्दा पकडत विरोधकांना इशारा दिला. “आपण सगळ्यांनी सांगितलं की २५ वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत. पण आता माझं वय २३ आहे आणि २५ होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही याची खात्री देतो,” असं रोहित पाटील यांनी म्हटलं.
