scorecardresearch

रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंना मनसे सोडताना केलेल्या वक्तव्याची करुन दिली आठवण; म्हणाल्या “वसंतभाऊ हत्या झाली की…”

मीदेखील अशाच राजकारणाला कंटाळून पक्षातून बाहेर पडले; रुपाली ठोंबरेंचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत मोरे यांची पक्षानं पदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर्स येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली असताना रुपाली ठोंबरे यांनीदेखील आता यावर भाष्य केलं आहे. टीव्ही ९ शी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंना आपण मनसे सोडून जाताना केलेल्या टीकेची आठवण करुन दिली आहे.

काय म्हणाले होते वसंत मोरे –

“आता प्रत्यक्षात रिकामटेकडं कोण आहे ते आता पुणेकरांना कळेलं. मला वाटतं ही रुपाली पाटील यांनी केलेली राजकीय आत्महत्या आहे. रिकामटेकड्यांचा त्रास झाला असं रुपाली पाटील यांनी म्हणणं हा फार मोठा जोक आहे,” असं विधान वसंत मोरे यांनी रुपाली पाटील यांनी मनसे सोडल्यानंतर केलं होतं.

रुपाली ठोंबरेंचं उत्तर –

“मी मनसेचा राजीनामा दिला होता त्यावेळी माझे बंधू म्हणाले होते की, ताईची राजकीय आत्महत्या केली. वसंतभाऊ आज तुमची हत्या केली की आत्महत्या आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. तरीदेखील वसंतभाऊसारखा कार्यक्षम लोकप्रतिनीधीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कालही स्वागत केलं आहे. कधी कधी निर्णय घ्यावा लागतो. लोकप्रतीनीधींमध्ये निर्णयक्षमता असावी लागते. कालच वसंत मोरे यांनी निर्णय घेतला असता, तर आज ही वेळ आली नाही,” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

“वसंत मोरेंचं काम आपण पाहिलं आहे, ते खूप चांगलं काम करतात. त्यांना सर्व जातीपातीची लोक मतदान करतात. आज ज्या पद्धतीने ही खांदेपालट झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र साईनाथ बाबर यांच्या प्रभागातही मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे, त्यामुळे ही कुठली खेळी आहे हे कळत नाही,” असेही त्या म्हणाल्या आहेत. मनसेत हेच चालतं असा आरोपही त्यांनी केला.

“वसंत मोरे हे प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. मोरे यांना ज्याप्रकारे शहराध्यक्षपदावरून दूर करण्यात आलं, ती दुर्दैवी गोष्ट आहे. मनसेच्या अंतर्गत राजकारणातून ही खेळी खेळली गेली आहे,’ असा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. अशाच मनसेच्या खेळींना वैतागून मी मनसे सोडली असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp rupali thombre on mns vasant more raj thackeray sgy