scorecardresearch

“हीच खरी वेळ आहे, बाळासाहेबांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येऊन..”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं सूचक वक्तव्य!

“बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते, तर त्यांनी हो होऊ दिलं नसतं. या दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला सावरण्याची ही वेळ आहे”

uddhav thackeray raj thackeray
"राम-लक्ष्मणासारखी भावाची जोडी हिंदुत्वाच्या निमित्ताने दाखवणं गरजेचं आहे!" (संग्रहीत छायाचित्र)

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची अट शिंदे गटानं घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ती फेटाळून लावली. जवळपास ३८ शिवसेना आमदार आणि इतर अपक्षांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा असताना ते दुसऱ्या पक्षात विलीन न झाल्यास अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती नेमकं कोणतं वळण घेणार? याविषयी उत्सुकता असतानाच राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं एक सूचक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

एकीकडे एकनाथ शिंदेंसारख्या कट्टर शिवसैनिकानं ३८ शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडली असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपला उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका वारंवार मांडली आहे. या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना शिवसेनेतूनच असलेल्या विरोधाची चर्चा सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याविषयी वक्तव्य केलं आहे. तसेच, वनवासात जाण्याची वेळ रामावर आल्यानंतर लक्ष्मण सर्वकाही सोडून त्याच्यासोबत गेला होता, असं उदाहरण देखील पाटील यांनी दिलं आहे.

“हीच खरी वेळ”

“महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात नेमका कुणाचा दबाव आहे आणि कोण सत्तेसाठी काय करतंय हे वारंवार सांगण्याची गरज नाही. पण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणूस जगवण्यासाठी योगदान दिलं आहे. म्हणूनच ही खरी वेळ आहे त्यांच्या लेकरांनी एकत्र येण्याची असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं मत आहे”, असं रूपाली ठोंबरे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.

Maharashtra Political Crisis Live : “त्यांचं वेट अँड वॉच असेल, तर आमचंही…”, संजय राऊतांचा भाजपाला टोला!

“राम-लक्ष्मणासारखी भावाची जोडी…”

“आपण जय श्रीरामचा जल्लोष करतो. त्या श्रीरामांवर वनवासात जाण्याची वेळ आली होती. तेव्हा भाऊ लक्ष्मण सगळी सुखं सोडून मोठ्या भावासोबत गेला होता. त्यामुळे आता फक्त राम-लक्ष्मणासारखी भावाची जोडी हिंदुत्वाच्या निमित्ताने दाखवणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी नाही, तर महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी, त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा घाट सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्याचा घाट सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते, तर त्यांनी हो होऊ दिलं नसतं. या दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला सावरण्याची ही वेळ आहे”, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp rupali thombre patil on uddhav thackeray raj together eknath shinde rebel pmw

ताज्या बातम्या