scorecardresearch

“राज ठाकरेंसारख्या लोकांना…”; राज ठाकरेंच्या भोंगाविरोधी आवाहनानंतर मोदींचा उल्लेख करत राष्ट्रवादीचं प्रतिआवाहन

जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केलंय.

NCP MNS Letters
ट्विटरवरुन शेअर करण्यात आलं पत्रक (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलंय. राज यांनी पत्रक जारी करुन हे आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक पत्रक जारी करुन तरुणांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

नक्की वाचा >> “…आणि महाविकास आघाडी राज ठाकरेंना तुरुंगात डांबेल”; चंद्रकांत पाटलांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रामुख्याने तरुणांना आवाहन करताना राज ठाकरेंचा भाजपाकडून वापर केला जात असल्याचा आरोप केलाय. महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंनी भोंग्याविरोधातील आवाहन केल्यानंतर तासाभरामध्येच एक पत्रक पोस्ट करत भाजपा आणि मनसेवर निशाणा साधलाय.

उन्माद पसरवून देशाचे पावित्र्य…
“राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला विशेषत: युवकांना विनंती आणि आवाहन करण्यात येत आहे की, वाढलेली महागाई, पेट्रोलस डिझेल, गॅस दरवाढ, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, उद्योग यामुळे भाजपाला आणि मोदी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पुढे करुन देशात धार्मिक हिंसा, द्वेष, उन्माद पसरवून देशाचे पावित्र्य व बंधुभाव संपवण्याचे काम भाजपा करत आहे,” असं राष्ट्रवादीने म्हटलंय.

नक्की वाचा >> राज ठाकरेंनी आवाहनाचं पत्रक पोस्ट केल्यानंतर तासाभरातच राऊतांचं ट्विट; शरद पवारांना टॅग करत म्हणाले, “निकले हैं वो लोग हमारी…”

या सुंदर भारताला भाजपा, राज ठाकरे…
तसेच, “धार्मिक मुद्दे पुढे करुन मोदींचे अपयश झाकण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. आपल्या मुलांचे भावी आयुष्य कोणत्या दिशेने घेऊन जायचे याचा विचार जनतेने करावा. भाजपा जो देश बनवू पाहत आहे तो आपला मूळ भारत नाही. गुण्यागोविंदाना नांदणारा, सर्व जातीधर्मांच्या लोकांमध्ये एकोपा, प्रेम, बंधुभाव जपणारा आपला भारत आहे. या सुंदर भारताला भाजपा, राज ठाकरे नष्ट करु पाहत आहेत. राजकारणा बाजूला ठेवून हा सुंदर देश वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे,” असंही या पत्रात म्हटलं आहे.

नक्की पाहा >> “ज्या दिवशी माझं सरकार महाराष्ट्रात येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज…”; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा जुना Video

आपणच आपल्या कुटुंबाचे…
“आपण सर्वांनी समाजात, सर्व जाती धर्मांमध्ये एकोपा, प्रेम, बंधुभाव जपला जाईळ तो वाढवला जाईल याची काळजी घ्यावी. अफवांना बळी पडू नका. धार्मिक उन्मादाला थारा देऊ नका, एकमेकांचा द्वेष करु नका, हिंसाचाराला पूरक वातावरण तयार होईल अशी कोणतीही कृती कोणथ्याही धर्माकडून होऊ नये याची काळजी घ्या. आपणच आपल्या कुटुंबाचे, मुलांचे, समाजाचे, राज्याचे, देशाचे भविष्य सुरक्षित ठेवूया,” असं आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलंय.

राज नेमकं काय म्हणाले?
जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असं राज यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

…तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल
मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी. रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

याची हिंदुंनी काळजी घ्यावी
देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात येऊन द्यावीत. मशिदीत बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या १०० क्रमांकावर भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार करावी. ती रोज करावी, असा कार्यक्रमही राज ठाकरे यांनी जाहीर केला. तसेच ज्या मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत त्याचे स्वागत करत त्या मशिदीच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही याची हिंदुंनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

एवढ्या हिंदुंना डांबू शकत नाही
हा विषय एका दिवसात सुटणार नाही. प्रत्येक राज्यातील हिंदुंनी आपापल्या सत्ताधारी-राज्यकर्त्यांना हिंदुंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे. देशाच्या कारागृहात तमाम हिंदुंना डांबणे सरकारला शक्य होणार नाही हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज यांचा पवारांना टोला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती. ते तुम्ही ऐकणार आहात की नाही. की सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात, याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर होऊन जाऊ दे, असे आव्हान राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp says maintain peace after raj thackeray letter about loudspeakers mosques scsg

ताज्या बातम्या