NCP Sharad Pawar Hospitalized : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद बाग येथून त्यांना खासगी कारमधून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आलं असून रुबी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत आहेत अशीही माहिती मिळाली आहे. शरद पवार यांना कफाचा त्रास होत असून श्वास घेण्यासही काही प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने गोविंदबाग बारामती या ठिकाणाहून पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
शरद पवारांची प्रकृती बिघडली
शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. त्यांची प्रकृती अचान बिघडली. त्यांचा घसा दुखतो आहे तसंच कफाचाही त्रास जाणवतो आहे त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला काही प्रमाणात त्रास होतो आहे. त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवारांचे पुतणे श्रीनिवास पवार यांनी सांगितलं शरद पवार यांना होणारा कफाचा त्रास रविवारी रात्रीपासून वाढला आहे, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलं?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर परवेझ ग्रँट म्हणाले की आमच्या डॉक्टरांचं एक पथक शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. काही चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यानंतर औषधांचा दिनक्रम आणि प्रमाण ठरवता येईल.” डॉ. ग्रांट यांनी हिंदुस्थान टाइम्सला ही माहिती दिली. शरद पवारांवर कर्करोगाची शस्त्रक्रिया २००४ च्या आधी झाली आहे. त्यांच्यावर अमेरिका आणि भारत अशा दोन्ही देशांमध्ये याच आजारासंबंधीच्या काही शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर, राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत होते. दरम्यान, आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं आहे.
