Congress – Sharad Pawar NCP Merger: राष्ट्रवादीचा (शरद पवार) २७ वा वर्धापनदिन साजरा होत असताना पक्षाच्या काँग्रेसबरोबर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस मजबूत होण्याची गरज व्यक्त करताना यापूर्वी बाहेर पडलेल्यांनी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी भूमिका शिवसेना (उबाठा) संजय राऊतांनी मांडली. तर, शरद पवारांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव आधीच दिल्याचा खुलासा काँग्रेस नेते नाना पटोलोंनी केला आहे. यामुळे खरंच पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आणि भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव – नाना पटोले
“शरद पवारांकडून राष्ट्रवादी विलिनीकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता पण, काही कारणास्तव त्याला विलंब झाला”, असा खुलासा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला. “समविचारी पक्ष एकत्र देण्याची प्रक्रिया देश पातळीवर सुरु झाली असून, त्याचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) विलिनीकरणाचा विचार करत आहेत”, असे पटोले म्हणाले. विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दिल्लीत हायकमांडने बोलावलेल्या बैठकीला जात असताना पटोलेंनी विलिनीकरणावर भाष्य केले. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिले स्पष्टीकरण
दरम्यान, नाना पटोलेंनी केलेला विलिनीकरणाचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. “काँग्रेसकडून कधीच विलिनीकरणाचा प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांकडून माहिती देण्यात आली असती”, असे शिंदेंनी स्पष्ट केले आहे. सिल्वर ओक निवसास्थानी पार पडलेल्या बैठकीत देखील विलिनीकरणाबाबात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊतांनी भूमिका आणि सुप्रिया सुळेंची सावध प्रतिक्रिया
“अखंड काँग्रेससाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पुढाकार घ्यावा”, अशी भूमिका शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी मांडली. “काँग्रेस अधिक मजबूत व्हायला पाहीजे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लहान पक्षांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला हवी. एक मजबूत काँग्रेस आणि प्रबळ काँग्रेस देशात पर्याय म्हणून उभी राहायला हवी. देशात ही भावना आणि विचार आकार घेतोय त्याचे शरद पवारांनी नेतृत्व केलं किंवा पुढाकार घेतला तर हा विचार पुढे जाईल”, अशी भूमिक संजय राऊतांनी मांडली. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी सावध प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत अतिशय परखडपणे देशाच्या हितासाठी मत मांडत असतात. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. संजय राऊत माझ्यासाठी मोठे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांची नोंद आम्ही घेऊ”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपा नेत्यांनी काय म्हटलं?
विलिनीकरणाच्या चर्चेवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेस बुडती नाव असल्याचे मत मांडले. “काँग्रेस बुडती नाव आहे. शरद पवारांच्या नावेतून लोक पळून, जो चांगला चॉईस आहे तिथं जातील, सध्या चांगला चॉईल भाजपा आहे. ग्रामपंचयात ते लोकसभा सध्या काही समस्या दिसत नाही, २० -२५ वर्षे भाजपाच आहे. त्यामुळे विकासाची कामं करुन घेण्यासाठी काँग्रेस निवडतील की भाजपा?”, अशी प्रतिक्रिया पाटलांंनी दिली. तर, गिरीश महाजनांनी विलिनीकरणासाठी शुभेच्छा देत, “राहुल गांधी आणि शरद पवार चांगल काम करतील, सक्षम विरोधी पक्ष असायला हवा, राज्यात तो शिल्लकच नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.
