नागपुरात आपल्या पक्षाची शक्ती मर्यादित होते. अनिल देशमुख आणि इतर सहकारी काम करत होते, पण त्यांच्यावर संकट आलं. त्यामुळे येथे प्रभावीपणे काम कसं करायचा असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाला आहे. पण शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी जबाबदारी खांद्यावर घेतली आणि तुम्ही सर्वांनी साथ दिली तर चित्र सुधारेल यात शंका नाही असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
“काही लोकांच्या मनात मागील वेळी आपण कमी जागा लढवल्या याबद्दल अस्वस्थता होती याची कल्पना आहे. यावेळी किती जागा लढवायच्या, युती करायची की नाही, करायची तर कोणत्या अटीवर करायची आणि अटी मान्य होत नसतील तर निवडणूक कशी लढवायची याचा निर्ण एकत्र बसून घ्या. तुमचा निर्णय पक्षाचा निर्णय असेल,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
“पक्षाचा पाया मजबूत करायचा असेल तर विधानसभा निवडणुकीला सामोरं जांव लागेल. त्याचीही तयारी करावी लागेल. प्रमुख मतदारसंघांसंबधी आम्हाला सांगा, त्यादृष्टीने आपण तयारी करु,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. तसंच नागपुरात भाजपाचं वर्चस्व वाढत असलं तरी नागपूर आणि नागपूरची मानसिकता पुरोगामी विचारांची आहे असं शरद पवारांनी सांगितलं.
अनिल देशमुख आणि नवाब मलिकांवर सूडबुद्धीने कारवाई
“पहिल्या दिवसापासून सरकार घालवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यामध्ये आपल्या दोन नेत्यांना जबरदस्त किंमत मोजावी लागली. अनिल देशमुखांचं काम उत्तम होतं. पण जुन्या शिक्षणसंस्थेला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं निमित्त करुन त्यांच्यावर खोटे खटले टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर केला असता आणि त्यासाठी कारवाई झाली असती तर समजू शकतो. दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांच्यावरही तीच वेळ आली. नवाब मलिक मांडणाऱ्या भूमिकेकडे देशाचं लक्ष असायचं. दिल्लीत संसदेतही काही सरकारी नवाब मलिक आज काय म्हणाले असं विचारायचे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना हे सहन झालं नाही, आणि त्यांच्यावर जुन्या केसमध्ये कारवाई करत आपल्यापासून बाजूला केलं,” असा आरोप शरद पवारांनी केला.