Vikas Lavande Ink Attack Pune: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर किर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या साथीदारांकडून शाईफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आळंदी मातोबाची, तालुका हवेली येथे आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. “भंडारे आणि १० ते १५ गुंड गोरक्षकांनी गाडी अडवून अंगावर शाई ओतली आणि धक्काबुक्की करुन पिस्तूल दाखवली”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते लवांडे यांनी केला आहे. या घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, लवांडे यांनी भंडारे यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर सत्याग्रह करण्याची भूमिका घेतली आहे.

शाईफेक केल्याचा व्हिडीओ समोर

किर्तनकार संग्राम भंडारे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात भंडारे आणि त्यांचे साथीदार लवांडे यांच्याशी शाब्दिक वाद घालताना दिसत असून, त्यानंतर ४ ते ५ जण लवांडे यांच्या अंगावर शाई ओतताना दिसत आहेत. बाटलीतून लवांडे यांच्या अंगावर शाई ओतल्याचा भंडारे यांनी शेअर केलेला व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

शाईफेकबाबत भंडारे काय म्हणाले?

“विकास लंवाडे यांनी आम्ही गुरुवर्य मानतो त्यांची नावं मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना घुसखोर म्हटले, त्यामुळे शाईफेक केली”, असे भंडारेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना भूमिका मांडली. तसेच, लवांडे यांनी पिस्तूल असल्याचा केलेला दावा भंडारेंनी खोडून काढला. “पिस्तूल असते तर शाईफेक केली असता का?”, असेही भंडारे म्हणाले. लवांडे खोटे आरोप करुन, नको त्या गोष्टी पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विकास लंवाडे यांनी स्पष्ट केली भूमिका

“आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर दहा वाजता परत जात असताना गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि धक्काबुक्की केली व पिस्तूल दाखवले. आणि लोक जमा होऊ लागल्यानंतर ते पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे. पुणे पोलिस आयुक्तांनी माझ्यावर हल्ला करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, त्यांना अटक करावी तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करणार आहे”, अशी भूमिका लंवाडे यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादीकडून निषेध

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात लवांडे पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून भंडारे यांनी भ्याड हल्ला केल्याचा आरोप पवारांनी केला. “लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी”, असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे.

विविधे नेत्यांकडून टीका, राणेंकडून समर्थन

दरम्यान, रोहित पवारांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास स्वत: पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे देखील म्हटले आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी देखील घटनेचा निषेध करत “हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता?”, असा सवाल उपस्थित केला. तर, “वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात आपण यशस्वी झालात”, असा शब्दात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लंवाडे यांनी शुभेच्छा देत शाईफेक घटनेचा निषेध केला. दुसरीकडे संग्राम जगताप आणि नितेश राणे यांनी भंडारे यांच्या या कृतीचे समर्थन केले आहे.