राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन वाद सुरु झाला असून शरद पवारांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल असं सांगत शरद पवारांनी अमोल कोल्हेंचं समर्थन केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधणाऱ्या भाजपा नेत्यांना उत्तर देत टोला लगावला आहे. भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले अशी विचारणाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार नेमकं काय म्हणाले –

“महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

लोकसत्ता विश्लेषण: राष्ट्रवादीत वादावादीस कारणीभूत ठरलेलं नथुराम गोडसे प्रकरण आहे तरी काय?

“अमोल कोल्हेंची भूमिका कलावंत म्हणून”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे सीतेचं अपहरण केलं याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचं अपहरण त्या कलाकारने केलं असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून आहे”.

अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन सुरु असलेल्या वादावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “अफझल खानाचीही…”

“नथुरामचं महत्व वाढवण्याचा यात कोणताही हेतू नाही”

“अमोल कोल्हेंनी २०१७ मध्ये ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाही. पण कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल तर याचा अर्थ गांधींजींच्या विरोधात काहीतरी आहे असा नाही. नथुराम गोडसेने जे काम केलं आहे त्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ, नाराज, दु:खी आहे. त्या नथुरामचं महत्व वाढवण्याचा यात कोणताही हेतू नाही. याकडे एक कलावंत म्हणून आणि या देशात घडलेला इतिहास समोर ठेवून पहायला पाहिजे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

“गोडसे मुर्दाबाद बोलून तर दाखवा,” कन्हैय्या कुमारने भर कार्यक्रमात राम कदमांना दिलं आव्हान; पण शेवटपर्यंत…

“भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले”

भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेसंबंधी बोलताना टोला लगावत ते म्हणाले की, “भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले. भाजपा आणि आरएसएसच्या इतिहासावर मी भाष्य करु इच्छित नाही. पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या कुठे आहेत ते बघितलं पाहिजे, त्यानंतर त्यांनी बोलावं”. आव्हाडांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी त्यांचं मत मांडलं असं शरद पवार म्हणाले. तसंच मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो असंही म्हणाले.

अमोल कोल्हेंनी काय बाजू मांडली आहे?

“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on bjp rss amol kolhe mahata gandhi nathuram godse sgy
First published on: 21-01-2022 at 15:04 IST