शरद पवार हृदयात आहेत बोलणाऱ्यांचं हृदय तपासा – शरद पवार

तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही असा टोला शरद पवारांनी लगावला आहे

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावत तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही असं म्हटलं आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

“शरद पवार हृदयात आहेत बोलणाऱ्यांचं हृदय तपासा”, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. तसंच अजून कोणी जाणार असेल तर त्यांनाही शुभेच्छा असंही यावेळी त्यांनी म्हटलं. “साताऱ्यासाठी माझ्याकडे तीन अर्ज आहेत. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी राखेल याची काही चिंता नाही”, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

विरोधी आमदारांना धमकावलं जात आहे. त्यांच्या मतदारसंघातील कामे अडवून व दबाव टाकून, आमिषे दाखवून पक्ष प्रवेशाचा दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी शरद पवार यांनी केला. “सत्ता नसतानाही कामे होऊ शकतात. पण सत्ताधाऱ्यांना तोंड देऊ शकत नाहीत म्हणून काहीजण गेले. तरीपण या वेळेस साताऱ्याची जागा आम्हीच राखू. या जागेसाठी राष्ट्रवादीतून तीन अर्ज माझ्याकडे आले आहेत.ये थून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार’, असं शरद पवारांनी सांगितलं. “उमेदवार कोण देता येईल याबाबत चर्चा सुरू असून राजघराण्यातील उमेदवार देता येईल का ? याबाबत अद्याप उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा झालेली नाही. उद्या ते मला भेटण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी आम्ही निश्चित काय ते ठरवू”, अशी माहिती यावेळी शरद पवारांनी दिली.

शरद पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्या भाजपा प्रवेशावरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, “शिवेंद्रराजे मला भेटले तेव्हा पक्ष सोडणार नाही असं सांगितलं होतं. शिवेंद्रराजे यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं. आता ते सत्य सोडून काही सांगतात हे मला माहिती नव्हतं”. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात संघर्ष झाल्याचं वृत्त फेटाळलं. सत्तेत नसल्याने आमची कामं होत नाहीत असं त्यांनी सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलं.

शिवेंद्रसिंहराजे भाजपामध्ये गेल्यामुळे जिल्हापरिषद आणि जिल्हा बँकेच्या राजकारणावर काही फरक पडेल का ? या प्रश्नावर त्यांनी याबाबत मला येथील नेमकी परिस्थिती माहित नाही अंस सांगत शेजारी बसलेल्या आमदाराकडे बोट करून काही फरक पडेल काय असे विचारले त्यावर सर्वांनी काहीही फरक पडणार नाही असे सांगितले.

बालेकिल्ल्यात झालेल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार साताऱ्यात दाखल
सातारा जावळीचे आमदार व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे व पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर लगोलगच रात्रीच पवार सातार्‍यात आले. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेटवर्क व कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे त्यामुळे ते काळजी घेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला भगदाड पडल्यानंतर शरद पवारांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून ते सातार्‍यात आले आहेत. बुधवारी रात्री उशीरा शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी उपस्थित होते. पवारांनी बंद खोलीत या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. सातारा, जावळीतील घडामोडींबाबत त्यांनी विशेष माहिती घेतली. पवारांनी तालुकानिहाय संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगानेही आढावा घेतला. बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची प्रचंड पडझड झाली. या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार बुधवारी रात्रीच सातार्‍यात दाखल झाले असून पडझडीनंतरच्या घडामोडींचा ते स्वत: आढावा घेत आहेत.शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशावर काय भाष्य करणार व जिल्ह्यातील पक्षाची आगामी रणनिती काय असणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp sharad pawar on leaders joining bjp shivsena satara sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या