scorecardresearch

राज ठाकरेंना मोदी सरकार सुरक्षा पुरवणार असल्याच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले “जर त्यांच्या…”

मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्राचे सुरक्षा कवच मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मनसेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान राष्ट्रवाची काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना यावर […]

NCP Sharad Pawar MNS Raj Thackeray

मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्राचे सुरक्षा कवच मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मनसेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान राष्ट्रवाची काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार सोमवारी कर्नाटकात होते. यावेळी त्यांनी येथे आम्ही पक्षाची बांधणी करत असल्याचं सांगितलं. “ज्या राज्यांमध्ये आमची शक्ती कमी आहे त्यापैकी कर्नाटक एक राज्य आहे. येथे जास्त लक्ष द्यावं यादृष्टीने मी सुरुवात केली आहे. मी आणि माझे सहकारी वर्षभर दौरे करत या ठिकाणी पक्षाचं काम वाढवतील,” अशी माहिती शरद पवारांनी दिली.

“देशात सांप्रदायिक स्थिती निर्माण कऱण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांच्या सहाकऱ्यांच्या वतीने होत आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. यासोबतच काही राष्ट्रीय प्रश्न आहेत. जसं सांप्रदायिक विचार वाढणं चिंताजनक आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती सामान्य माणासाला त्रासदायक आहे. त्यावरही बोलावं अशी आमची मागणी आहे,” असं शरद पवार म्हणाले.

विरोधकांची मोट बांधण्यासंबंधी प्रश्नावर ते म्हणाले की, “आपण एक बैठक घ्यावी अशी अनेकांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे आणि मी पुढाकार घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे”.

राज ठाकरेंना सुरक्षा देण्यासंबंधी सुरु चर्चेवर ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असेल तर ते अयोध्येला जाऊ शकतात, हा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही”.

राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. गेल्या काही दिवसात राज्य सरकारविरोधात भूमिका घेतल्यानंतर सरकारने राज यांची सुरक्षा कमी केल्याचा मनसेचा आरोप आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याबाबत बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला ७ फेब्रुवारी रोजी पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याने पुन्हा राज्य सरकारला पत्र लिहिणार असून, गृहमंत्री अमित शहा यांना देखील विनंती करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp sharad pawar on mns raj thackeray to security from centre sgy