बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी अद्यापही तपास सुरु असून ड्रग्ज प्रकरणात रोज नव्या सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन महिन्यांपासून एका आत्महत्येवर इतकी गंभीर चर्चा सुरु आहे अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवारांना सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुरु असलेल्या तपासात आता ड्रग्ज प्रकरणी अनेक सेलिब्रेटींची नावं समोर येत असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “मला माहिती नाही, मी याकडे लक्ष देत नाही. आत्महत्या कोणाचीही असो दुख होतं यात काही वाद नाही. पण एका आत्महत्येवरुन गेले तीन महिने देशात इतकी गंभीर चर्चा सुरु आहे. पण मला भीती आहे ती म्हणजे दिवसाला १० ते १५ तर महिन्याला ५० ते ६० शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटत नाही”.

मी आज दिवसभर अन्नत्याग करणार – शरद पवार
शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, निवडणूक पत्राबाबत मागितलं स्पष्टीकरण
कृषी विधेयकांवरुन राज्यसभेत झालेल्या गोंधळावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस
शरद पवार यांनी यावेळी आयकर विभागाने आपल्याला नोटीस पाठवली असून निवडणूक पत्राबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं असल्याची माहिती दिली. “आदित्य आणि सुप्रिया यांच्या आधी आधी मला नोटीस आली. कदातिच माझा ग्रेड थोडा वरचा आहे. आता सुप्रियाला येणार आहे असं कळलं, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचं उत्तर लवकरच मी देईन,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.