परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या समर्थकांसह त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. भांबळे यांच्या या निर्णयाने जिंतूर तालुक्यातील राजकारण अधिक गुंतागुंतीचे होईल असे मानले जाते.
भांबळे हे सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या सोबतच राहतील असाही अनेकांचा कयास होता. तथापि मतदारसंघातील राजकीय समीकरणामुळे त्यांनी शरद पवारांची साथ करणे ठरवले. जिंतूर विधानसभेचे प्रतिनिधित्व सध्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या करतात. भांबळे विरुद्ध बोर्डीकर असा संघर्ष या मतदारसंघात गेल्या दोन दशकांपासून आहे.
अशा स्थितीत सत्ताधारी राष्ट्रवादीसोबत राहण्यापेक्षा शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय भांबळे यांनी घेतला होता. गेली विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनच लढवली होती. या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते राजकीय पर्यायाच्या शोधात होते. भांबळे यांना निर्णय घ्यायला उशीर लागत होता. त्यामुळे त्यांचे अनेक समर्थक यापूर्वीच निर्णय घेऊन मोकळे झाले. भांबळे यांनी मंगळवारी समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि भांबळे यांच्यात सातत्याने राजकीय संघर्ष राहिला आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार कुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुरेश नागरे यांनी गेल्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत निवडणूक लढवली होती तर भांबळे हे या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते. आता बोर्डीकर, भांबळे, नागरे हे तिघेही सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत.
मतदारसंघात मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये प्रत्येकाची मोर्चेबांधणी वेगळी असणार आहे. आपापल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकांमध्ये कसे सामावून घ्यायचे असा प्रश्न आता या सर्वांसमोर आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यानंतर भांबळे यांचे पुढील राजकारण या मतदारसंघात कसे राहील याबाबतही मोठी उत्सुकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याच्या चर्चा अनेक वेळा झाल्या. तथापि त्यांचा प्रवेश मात्र रखडला आहे.