मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगात एकाधिकारशाही राबवत असून त्यांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षांनी बुधवारी केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) मुद्द्यावर निवडणूक आयोगाचे सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी या अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यांच्या कालावधीत १४ आक्षेप नोंदवल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला म्हणत त्यांना हाकलून देण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ज्ञानेश कुमार हे चपला उचलणारे आयुक्त झाले नसते तर बरं झालं असतं. ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला आहे. महाराष्ट्रातला सत्ता बदल राजीव कुमार यांनी केला. एसआयआर हा स्कॅम म्हणजेच घोटाळा आहे. निवडणूक आयोग हा चोर आहे. चोर समोर दिसतोय पुढच्या चोऱ्या थांबण्यासाठी चोर पकडणं गरजेचे आहे. फॉर्म नंबर ६ मध्ये बदल करण्यात आले. लोकशाही जिवंत ठेवायला जनतेने आवाज उठवला पाहिजे. ज्ञानेश कुमार यांना हाकलून देण्यात यावे. तृतीय पंथीयांची नावंच नोंदवली जात नाहीत, त्यांना मतदानाचा अधिकार नाही. ज्ञानेश कुमार यांना कोणी तरी दुसरंच ऑपरेट करतंय, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे.

ज्ञानेश कुमार हा लोचट अधिकारी-आव्हाड

आव्हाड पुढे म्हणाले, एसआयआर फॉर्मबाबत सगळ्यांनी अशीच भूमिका घ्यावी. रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला पाहिजे. ज्ञानेश कुमार हा हलकट, लोचट अधिकारी आहे. राजीव कुमार हा लोचट अधिकारी नसता तर शरद पवार यांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला नसता. पक्षाचं नाव लावून तसेच क्लार्क म्हणून काम करतात. आयटी डिपार्टमेंटमध्ये येतेच कशी? निवडणूक आयोग कोणाच्या हाताचं खेळणं झालंय हे दुर्भाग्य आहे,” अशी टीका त्यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी फॉर्म ६ फाडत नोंदवला ज्ञानेश कुमारांचा निषेध

आपला संताप व्यक्त करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट फॉर्म नंबर ६ (Form Number 6) फाडून केंद्रीय निवडणूक आयोगाचा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जोरदार निषेध नोंदवला. मुख्य निवडणूक आयुक्त कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले आहे. या अंतर्गत वादानंतर आणि विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.