scorecardresearch

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून देशात ८ व्या क्रमाकांवर; राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणाला, “उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत शिंदे…”

इंडिया टूडे – सी वोटरच्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इंडिया टूडे – सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असे समोर आले आहे. तसेच देशभरात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? अशीही यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. या सर्व्हेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वैधतेचा निकाल जेव्हा लागेल, त्यावेळी इंडिया टुडेच्या सर्व्हेतून आलेला ३४ खासदारांचा आकडा ४० च्या आसपास जाईल, असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या तुलनेत शिंदे कमी लोकप्रिय असल्याचा टोलाही तपासे यांनी लगावला आहे.

हे ही वाचा >> आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”

“उध्दव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडी सरकारमध्ये उजवी ठरली होती. त्यामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे यांना स्थान मिळवता आले. मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना दहामध्येही स्थान मिळवता आले नाही. याचा अर्थ जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होत आहे”, असेही महेश तपासे म्हणाले. “आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दबावतंत्राचे राजकारण करुन सरकार काबीज केले ते जनतेला रुचलेले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल”, असेही महेश तपासे म्हणाले.

‘सी वोटरचा’ जो सर्व्हे आला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे असेही महेश तपासे यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर हे उध्दव ठाकरे यांचे नवीन मित्र झाले आहेत. मात्र देशपातळीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांच्या मोर्चाचे शरद पवारसाहेब हे नेतृत्व करत आहेत. जातीयवादाच्या विरोधातील हा मोर्चा असून यामध्ये पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य भाजपाविरोधात असेल, अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

टॉप मुख्यंमत्री कोण? एकनाथ शिंदे आठव्या क्रमांकावर

इंडिया डुटे – सी वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमाकांवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून त्यांना १६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून त्यांना सात टक्के लोकांनी पसंती दिली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यंमत्री एम. के. स्टॅलिन, पाचव्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, सहाव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरम, सातव्या क्रमाकांवर शिवराज सिंह चौहान, आठव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 18:41 IST
ताज्या बातम्या