scorecardresearch

राज ठाकरेंना लोक फार ओळखून आहेत, त्यामुळे… – जयंत पाटलांनी साधला निशाणा

गुजरात, उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे बंद झाले आहेत का? असा देखील सवाल केला आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय, राज ठाकरेंच्या सभांमधील भाषणांवरून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. राजकीय नेते मंडळींच्या विविध प्रतिक्रिया यावरून उमटत आहेत. जोरदार टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंच्या मुद्य्यांचा आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर काही परिणाम होऊ होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी, राज ठाकरेंना लोक फार ओळखून आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. असं म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने राज्यभर कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. याला राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा नाव देण्यात आलं आहे. या निमित्त साताऱ्यातील वाई मतदार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याप्रसंगी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी भोंग्यांच्या मुद्य्यावरून देखील निशाणा साधला, ”धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठीच भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा… हे करा ते करा असं सांगितलं जातय. गुजरातमध्ये मशिदींवरील भोंगे बंद झाले आहेत का?, उत्तर प्रदेशात बंद झाले आहेत का? याची जरा चौकशी करून या म्हणा.” असंजयंत पाटील यांनी बोलून दाखवलं.

भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे राज ठाकरे आज पुण्यात म्हणाले असं निदर्शनास आणताच जयंत पाटील म्हणाले की, “त्यांनी आता गुन्हा दाखल होऊ नये म्हणून याबाबत वकिलाचा सल्ला घेतलेला दिसतोय.”

कोल्हापूर पोटनिवडणूक निकालाबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया –

तसेच, कोल्हापूरची जागा सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आली असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचे सांगितले असता, यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी, “ही कोल्हापूरची जागा सहानुभूतीच्या लाटेवर निवडून येणार आहे असे वाटत होते तर त्यांनी निवडणूकच का लढवली?, येथील कोणत्याही पक्षाचा जनाधार कमी झालेला नाही. शिवसेनेची मते ही याठिकाणी शाबूत आहेत. पुढ्याच्या निवडणुकीतही आम्हीच ही जागा जिंकू त्यांनी भ्रमात राहू नये.” असा टोलाही लगावला.

याचबरोबर, राष्ट्रवादीची पक्षसंघटना विस्कळीत झाली म्हणून परिवार संवाद यात्रा नाही तर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ही राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा आहे. त्याला राज्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. असंही जयंत पाटील यांनी याप्रसंगी सांगितलं. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे,दीपक पवार, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp state president jayant patil criticized raj thackeray msr

ताज्या बातम्या