अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. काल पदभार स्वीकारल्यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी या भेटीबद्दल, तसेच दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
आज राजकीय चर्चेचा विषय नव्हताच, आज फक्त दादांच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर जी जबाबदारी धिरोदत्तपणे वहिनींनी सांभाळली आहे, त्याबद्दलच्याच संवेदना व्यक्त करण्यात आल्या असे सुनील तटकरे म्हणाले.
विलीनीकरणाबाबत तुमच्या पक्षाची भूमिका का असणार आहे? असा प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना तटकरे यांनी “आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे?” असे उत्तर दिले. पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की, आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरित्या एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो कालही होता, आजही आहे आणि उद्या भविष्यामध्येही राहिल. त्यामुळे एनडीएमध्ये येण्याबाबतची स्पष्टता कोणीतरी करणे आवश्यक आहे, असे तटकरे म्हणाले.
आता विलीनीकरण किंवा काय…उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी वहिनींनी स्वीकारली आहे. आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय सामुदायिकरित्या सर्व विधिमंडळ सदस्यांनी एकमताने घेतला. पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेन, भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि आमचे सर्व मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी असतील सर्वांनीच भूमिका घेतली की वहिनीच विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असल्या पाहिजेत. त्यापद्धतीने आम्ही निवड केली, असेही सुनील तटकरे म्हणाले.
भाजपाबरोबर सत्तेत असावं ही दादांची भूमिका…
एनडीएबरोबर येण्याची जर त्यांची (शरद पवारांचा गट) भूमिका असेल तर तुम्ही स्वागत करणार का? असा प्रश्न विचारला असता तटकरे यांनी उत्तर देणे टाळले. जर तर वर मी कसं बोलणार? कारण आपल्याला ज्ञात आहे की, २०१९ पासून किंवा २०१४ पासून भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये असावं अशी स्वर्गीय दादांची भूमिका होती. राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या सर्व बैठकीमध्ये दादा ती भूमिका स्पष्टपणे मांडतही आले. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एकत्रितपणे शपथविधी सुद्धा झाला. तेव्हा देखील दादांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की तीन पक्षांच्या सरकारपेक्षा दोन पक्षांचं सरकार विशेषतः भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार महाराष्ट्राला प्रगती पथावर नेईल अशी दादांची भूमिका त्या कालावधीमध्ये होते.
आपल्याला ज्ञात आहे की, २०२३ मध्ये ज्या वेळेला वारंवार पक्षामध्ये चर्चा होऊन देखील भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय होत नाही, त्यावेळेला आम्ही स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार आहे की बहुजन समाजाचे हित साधायचे असेल तर सत्तेमध्ये असलं पाहिजे. पण आमची मूळ विचारधारा, धर्म निरपेक्ष विचारधारा, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची सामाजिक समता या विचारासह आमचा एनडीएमध्ये सहभाग झाला. तो निर्विवादपणे पुढच्या कालावधीमध्ये राहणार आहे, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

