गेल्या काही महिन्यांपासून भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांच्या विरोधात गैरवापर करत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी या मुद्द्यावरून भाजपावर आरोप केले आहेत. सरकारमधील काही मंत्री आणि नेतेमंडळींवर ईडी, सीबीआय यांनी छापे टाकल्यानंतर त्यावरून राजकारण पेटलं आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभेत बोलताना भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकासआघाडी सरकार २५ वर्ष चालेल, असा ठाम निर्धार देखील बोलून दाखवला.

“हा एक प्रकारचा विक्रमच आहे!”

सुप्रिया सुळे यांनी यावेळी ईडी आणि सीबीआयनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यांविषयी सवाल उपस्थित केला. “अनिल देशमुखांच्या घरावर एका वर्षात ७ वेळा छापा टाकला गेला. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. कल्पना करा, तुम्ही एकाच कुटुंबावर ७ वेळा छापा टाकला. मग पहिल्या सहा वेळा काय चुकलं?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे. “तपास यंत्रणा आता संबंधित व्यक्तीच नाही, तर त्यांच्या कुटुंबाला देखील टार्गेट करत आहेत”, असं त्या म्हणाल्या.

हर्षवर्धन पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख

दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचंड व्हायरल झालेल्या विधानाचा उल्लेख केला. “हर्षवर्धन पाटील म्हणतात, आमच्याकडे ईडी-सीबीआय येऊ शकत नाही कारण आम्ही भाजपामध्ये आहोत. हे धक्कादायक आहे. ईडी आणि सीबीआय फक्त अशा राज्यांच्या विरोधात वापरल्या जात आहेत का जे राज्य तुमच्या विरोधात लढतायत? मी लहानाची मोठी झाले, तेव्हा मला माहितीही नव्हतं की ईडी-सीबीआय काय असतं? आजकाल तर रोज यांची चर्चा होते. कुणाच्या घरात घुसतात, कुणाच्या बायका-मुलांना घेऊन जातात. देशात ही एक नवी संस्कृती आली आहे”, असं त्या म्हणाल्या.

ईडी-सीबीआय नेमकं काय करतंय?

“एकनाथ खडसेंच्या कुटुंबाला देखील असंच केलं गेलं. त्यांच्या मुलीला, त्यांच्या पत्नीला का चौकशीसाठी बोलावण्यात आलं? त्यांच्या पत्नी वयोवृद्ध आहेत. ईडी आणि सीबीआय नेमकं काय करतंय? महिलांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? जर तुम्हाला राजकीय हल्ला करायचा असेल, तर समोरून करा, कुटुंबियांच्या मागे का पडला आहात? हे खरंच लाजिरवाणं आहे की राजकीय हेतूसाठी कुटुंबियांना टार्गेट केलं जात आहे”, असं त्या म्हणाल्या.

“गांधी लडे थे गोरों से, हम…”, न्यायालयाची माफी मागितल्यानंतर नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट चर्चेत!

“तुम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही..”

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष पूर्ण करेल, असा ठाम विश्वास सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला. “महाविकासआघाडी लढा देत आहे. तुम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही काही महिने देखील पूर्ण करू. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली २ वर्ष पूर्ण केली आहेत. ५ वर्ष पूर्ण करू आणि २५ वर्ष देखील पूर्ण करू आणि तुम्हाला दाखवून देऊ की महाराष्ट्रा देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांपैकी एक असेल जिथे चांगलं प्रशासन असेल आणि भ्रष्टाचार नसेल”, असं त्या म्हणाल्या.