राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच, सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या घडामोडींचेही पडसाद सभागृहात उमटताना पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीही झाल्याचं दिसून आलं. त्यावरून सुप्रिया सुळेंनी टीव्ही ९ शी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं विधानसभेत?

संजय राऊतांनी सोमवारी संध्याकाळी एक ट्वीट करून मंत्री दादा भुसे यांच्यावर गिरणा अॅग्रोच्या नावाने कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. त्यावरून मंत्री दादा भुसे विधानसभेत चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांना महागद्दार म्हणतानाच त्यांनी आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, असं आव्हानही दिलं. मात्र, यावेळी आपल्या निवेदनात दादा भुसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्यामुळे अजित पवार आक्रमक झाले. “संजय राऊत भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात माननीय शरद पवारांची” असं भुसेंनी म्हणताच अजित पवार संतापले.

अजित पवारांनी दिला इशारा!

“प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण दादा भुसेंनी त्यांची भूमिका मांडत असताना आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचा उल्लेख करण्याचं काडीचंही कारण नव्हतं. शरद पवार ५५ वर्षं समाजकारण-राजकारण करतात. नरेंद्र मोदींनीही शरद पवारांविषयी काय म्हटलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं असताना दादाजी भुसे, तुमच्याकडून तर ही अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. नाहीतर आम्हाला वॉकआऊट करावं लागेल”, असा इशाराच अजित पवारांनी दिला.

विषय संजय राऊतांचा आणि उल्लेख शरद पवारांचा, अधिवेशनात खडाजंगी; अजित पवार संतापून म्हणाले, “दादा भुसेजी, तुमचे शब्द..!”

या सर्व प्रकारावर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वाचाळवीर हा एक शब्द मी शिकलेय. हे ईडीचं सरकार आहे. ईडी म्हणजे एकनाथजी आणि देवेंद्रजींचं सरकार आहे. यात वाचाळवीर आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. मला त्यात आश्चर्य वाटत नाही. कारण आता दिल्लीत भाजपानं ठरवलंच आहे की संविधानाच्या बाहेरच जाऊन सगळं करायचं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“आज महाराष्ट्रात आणि देशात चाललेलं राजकारण अतिशय गलिच्छ आहे. याच्यासाठी आम्ही राजकारणात आलोच नाही. काहीतरी चांगलं धोरण स्तरावर व्हावं यासाठी आम्ही आलोय. गंभीर आव्हानं देशासमोर असताना ज्या पद्धतीने सत्तेत असणारे लोक वागतायत, त्यामुळे नुकसान विरोधी पक्षांचं होतंच, पण सत्ताधाऱ्यांचंही होणार आणि त्यापेक्षा जास्त ते मायबाप जनतेचं होणार”, असं सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule slams eknath shinde bjp dada bhuse on sharad pawar pmw
First published on: 21-03-2023 at 17:54 IST