scorecardresearch

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वागण्यामुळे मी नाराज नसून हैराण”, सुप्रिया सुळेंचा खोचक शब्दांत निशाणा!

सुप्रिया सुळे म्हणतात, “करोनास्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असताना त्यांनी…!”

supriya sule on pm narendra modi
सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना इंधन दरवाढीसाठी सर्वस्वी राज्य सरकारांना जबाबदार ठरवल्यामुळे त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. इतर बिगर भाजप शासित राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातूनही या दाव्यांचा राजकीय विरोध करण्यात येत असून त्यावरून राजकारण तापू लागलं आहे. पालघरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवरून खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

“आमचे पंतप्रधान सदासर्वकाळ…!”

“पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक (गुड्स स्टेस्ट्समन) सामान्यांना अपेक्षित आहे. त्याऐवजी आमचे पंतप्रधान सदासर्वकाळ राजकारणी म्हणून वागत असतात.ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे”, असा खेद सुप्रिया सुळे यांनी पालघरमध्ये व्यक्त केला. “त्यांच्या या वागण्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नसून हैराण आहे. आणि असं मी लोकसभेत व त्यांना वैयक्तिक भेटल्यानंतरही सांगितलं आहे”, असे सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

“ही बाब अतिशय दुर्दैवी”

दरम्यान, करोनाबाबतच्या आढावा बैठकीमध्ये पंतप्रधानांनी राज्य सरकारांवर इंधन दरवाढीवरून टीका करणं दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “करोनास्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असताना त्यांनी मूळ विषयाला बगल दिली. करोना स्थितीसाठी राज्यांशी या विषयावर चर्चा करताना त्यांनी राज्य सरकारवर सर्व गोष्टी ढकलणे ही बाब दुर्दैवी होती”,असे देखील सुळे म्हणाल्या.

“निवडणुकांमध्ये संघर्ष करा. भारताच्या पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून मोदींनी राज्यांची मदत करणे आवश्यक आहे. असे असताना महाराष्ट्रावर ते सातत्याने करत असलेली टीका ही दुःखद व वेदना देणारी आहे. कोविड पसरवला, महागाई या विषयावर बोलून महाराष्ट्रविषयी ते करत असलेली बदनामी अस्वस्थ करणारी आहे”, असं सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp supriya sule targets pm narendra modi on petrol diesel price hike in india pmw

ताज्या बातम्या