उदयनराजेंच्या बंडाने राष्ट्रवादी अस्वस्थ

शरद पवार यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत त्यांना सर्वाधिक साथ देणारा जिल्हा म्हणजे सातारा.

NCP satara MP , Udayanraje Bhosale , anticipatory bail rejected , extortion case , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Udayanraje Bhosale : या प्रकरणाला उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील वादाची किनारही आहे. या कंपनीत उदयनराजे आणि रामराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या दोन संघटना आहेत.

सातारा जिल्ह्यत नगरपालिका निवडणुकीची पुनरावृत्ती होणार?

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार उदयनराजेंच्या बंडाचा मोठा फटका बसत असून, उदयनराजेंच्या पुढाकाराने राष्ट्रवादीविरोधात सारे जण असे चित्र उभे राहते का, याकडे जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता असून, पालिकेच्या निवडणुकीत साताऱ्यात घडले ते जिल्ह्यात घडणार का, या चच्रेला ऊत आला आहे.

शरद पवार यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत त्यांना सर्वाधिक साथ देणारा जिल्हा म्हणजे सातारा. राजकारणात पवार कोठेही असोत, पण पवारांची इथली पकड मजबूतच राहिली. या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषद, जिल्हा बँकेसहस्थानिक संस्थांवर अपवाद वगळता राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. मात्र, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या गोतावळय़ाशी न जमलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत जनता हाच पक्ष आणि मतदारांची भूमिका हाच अजेंडा, अशी भूमिका मांडत स्वपक्षीयांची जिरवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला घरच्या मैदानावर चीतपट करण्याची संधी काँग्रेस व भाजपसारख्या विरोधकांना चालून आली आहे. अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत साताऱ्यात खासदार उदयनराजेंनी आपली ताकद दाखवून दिली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुलत्याच्या पत्नीला पराभूत करीत राजा विरुद्ध प्रजा या वादात आपली पकड अधिक घट्ट केली होती. विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पराभवही राष्ट्रवादीला फारच झोंबला आहे. तेथेही खासदारांच्या भूमिकेविषयी राष्ट्रवादीत संशयाची भूमिका होती.

सातारा जिल्हा परिषदेत यापूर्वी ६७ गट व ११ पंचायत समित्यांसाठी १३४ गण होते. निवडणूक आयोगाने लोकसंख्येच्या निकषानुसार नव्याने केलेल्या फेररचनेत तीन गट व ६ गण कमी होऊन आता ६४ गट व १२८ गण निर्माण झाले. सध्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, राष्ट्रवादीचे ३९, काँग्रेसचे २१, पाटण विकास आघाडीचे ३, जावळी विकास आघाडी १ व अपक्ष ३ असे संख्याबळ आहे.

सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्याने ग्रामीण भागात राजकीय माहोल असला तरी पक्षीय राजकारण व नेत्यांच्या डावपेचांना अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. अवघ्या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्याच पक्षाविरोधात अपेक्षेप्रमाणे दंड थोपटून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांची मोट बांधताना, राजधानी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला स्वतंत्र पर्याय देण्याचा निर्धार केला आहे.

नोंदणीकृत होत असलेल्या या आघाडीला तीन आमदारांचा पाठिंबा असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. उदयनराजेंचे हे बंड शरद पवारांसारख्या मोठय़ा राजकीय शक्तीला शह देणारे असल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शरद पवार कसा अबाधित राखतात या खेळीकडेही उत्सुकतेने पाहिले जात आहे.

राष्ट्रवादीला सत्तामुक्त करण्याचा निर्धार

  • जिल्ह्यतून राष्ट्रवादीला सत्तामुक्त करण्याचा निर्धार उदयनराजेंनी केल्याने राष्ट्रवादीचे सच्चे नेते, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते हवालदिल आहेत.
  • अशातच उदयनराजेंचा सर्वपक्षीय नेत्यांशी असलेला दोस्ताना हा खऱ्या अर्थाने पवारांची डोकेदुखी ठरणार आहे.
  • काँग्रेस, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकांची एकजूट साधण्यात उदयनराजे यशस्वी होतात का? यावर बरेच काही अवलंबून असून, कराड दक्षिणचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणचे आमदार जयकुमार गोरे व पाटणचे शिवसेना आमदार शंभुराज देसाई हे तिन्ही दिग्गज लोकप्रतिनिधी कोणत्याही मार्गाने राष्ट्रवादीची पीछेहाट करण्याचेच राजकारण करतील, यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp upset due to udayanraje bhosale rebellion