दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. पुण्यातल्या महिलांनी कोल्हापुरात जाऊन चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निदर्शनं केली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीशी चर्चा करण्यासाठी शरद पवार किंवा त्यांच्या कोणत्याही पंटरनी समोर यावं असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. हे आव्हान स्वीकारत राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. त्यांनी आज चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निदर्शनं केली.
राज्यातील दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे. अशात शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद रंगतो आहे. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासन दुष्काळाचे योग्य प्रकारे निराकरण करत असल्याचा दावा केला. एवढंच नाही तर शरद पवार दुष्काळाचं राजकारण करत असल्याचाही आरोप केला. मंत्री पाटील यांनी दुष्काळी चर्चेबाबत परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार किंवा त्यांच्या कोणत्याही पंटरनी जाहीर चर्चेसाठी यावे,असे विधान केले होते. त्यानुसार आम्ही पाटील यांच्याशी चर्चेला तयार असल्याचे कळवले होते’, अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागदेव यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चर्चेसाठी थेट चंद्रकांतदादा यांच्या गावात समक्ष भेटून दुष्काळासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. ते उपस्थित राहिले नसल्याने कावळा नाका येथील ताराराणी चौकात निदर्शने केली’, असे नागदेव म्हणाल्या. पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सुमारे ३० महिलांनी संध्याकाळी झालेल्या आंदोलनात भाग घेतला. मागण्यांचे निवेदन मंत्री पाटील यांचे शासकीय स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव यांना देण्यात आले.
‘आता पुढचे पाऊल म्हणजे आम्ही मंत्रालयाच्या चौकातच दादांशी चर्चा करू’, असे महिला युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर म्हणाल्या. राष्ट्रवादी युवती महिला सातारा जिल्हाध्यक्ष कविता मैत्री, सांगली जिल्हाध्यक्ष छाया पटेल, सीमा पाटोळे, जहिदा मुजावर, नम्रता कांबळे आदींनी निदर्शनामध्ये सहभाग घेतला.