राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या विरोधात नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. घणसोली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन केतकी चितळेला अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच केतकी चितळेची मानसिक स्थिती बिघडल्याचा आरोप कर तिला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा, अशीही मागणी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मिनल म्हापणकर यांच्या नेतृत्वात कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या बाहेर केतकी चितळेच्या फोटोला ‘जोडे मारो आंदोलन’ देखील केले.

घणसोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मिनल म्हापणकर म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात स्वयंघोषित अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आम्ही आज कोपरखैरणे पोलीस स्टेशनला तक्रार केली. तसेच केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.”

हेही वाचा : “पवार साहेबांच्या पायापर्यंत नाही आणलं ना तर…” केतकी चितळे प्रकरणावर सविता मालपेकर यांची संतप्त प्रतिक्रिया

“आम्ही येथेच थांबणार नाही. आम्ही केतकी चितळेच्या इतरही पोस्ट तपासल्या आहेत. त्यातही तिच्या बऱ्याच वादग्रस्त पोस्ट आहेत. तिच्या पोस्टवरून ती मनोरुग्ण आहे असं दिसतं. त्यामुळे आम्ही कळवा पोलीस स्टेशनला अर्ज देऊन केतकी चितळेला मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी करणार आहोत. मनोरुग्णालयातील उपचाराचा जो खर्च असेल तो आम्ही घणसोली राष्ट्रवादीतर्फे देऊ,” असं मत मिनल म्हापणकर यांनी व्यक्त केलं.