परभणी : भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत काल (गुरुवारी) शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. पाटील यांची प्रतीकात्मक तिरडी काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विजय गव्हाणे, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय जामकर ,भावनाताई नखाते, शंकर भागवत, माजी नगरसेवक जाकेर लाला, पाशा भाई, नईम भाई, विलास लंगोटे, राजेंद्र वडकर, नंदा राठोड यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी परभणीत जोरदार निदर्शने केली. सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अशोभनीय टिप्पणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. खा.सुळे यांच्या सन्मानार्थ आणि पाटील यांचा धिक्कार करण्याकरिता कार्यकर्त्यांनी स्टेडिअम मैदानाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळय़ाजवळ प्रचंड घोषणाबाजी करीत पाटील यांचा धिक्कार केला. या वेळी कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी निषेधाचे फलक मोठया प्रमाणात लावले होते.