Sharad Pawar meets CM Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज (दि. ३ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन आठवड्यातली त्यांची ही दुसरी भेट आहे. याआधी त्यांनी भेट घेतली तेव्हा मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्याचे सांगितले होते. मात्र आजच्या भेटीमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच आजची भेट ही विशेष ठरते कारण शरद पवार वर्षावर जाण्याआधी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे वर्षा निवासस्थान हे राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. २२ जुलै रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांना मराठा - ओबीसी आरक्षण वादात मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली असून तुम्ही शांततेचे आवाहन करा, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करू, असे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी आरक्षण, दूध दरवाढ, विरोधकांच्या कारखान्यांना कर्ज नदेणे अशा विषयांची चर्चा केली होती. हे वाचा >> "अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज", उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ‘मी ढेकणाला आव्हान देत नाही’, उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले… राज ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा झाली? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही लोकांच्या समस्यांविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. वरळी विधानसभेत मागच्या पाच वर्षात काहीच काम झालेले नाही. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या कानावर काही गोष्टी घातल्या. बीडीडी चाळीतील दुकानदारांच्या ३६० स्क्वेअर फुटांचे घर मिळावे, पोलीस वसाहतीमधील पोलिसांच्या घरांचे प्रश्न सुटावेत, या मागण्या मांडल्या असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.