दुधाला ५ रूपयांची दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाने आता उग्र वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर सांडण्यात आले. तर काही ठिकाणी टँकरही पेटवण्यात आले. अजूनही सरकार व आंदोलकांमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे पुणे व मुंबईमध्ये आता दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘स्वाभिमानी’चे प्रमुख राजू शेट्टी यांनी या आंदोलनामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट करत राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तरित्या पाठिंबा दिल्याचे म्हटले. तसेच केंद्रातील रालोआ सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून कोणत्याही परिस्थिती रालोआत पुन्हा जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘एएनआय’शी बोलताना ते म्हणाले की, दूध दरवाढीच्या आंदोलनामागे कोणताही राजकीय हेतू नाही. शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी स्वयंस्फुर्तीने सुरू केलेले हे आंदोलन आहे. रालोआने शेतकऱ्यांना फसवले आहे. त्यामुळे मी पुन्हा रालोआत जाणे शक्य नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, सोमवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलावले नसल्याचे सांगितले होते. त्यांनी जर आपल्याला निमंत्रण दिले असेल तर त्याचे पुरावे जाहीर करावेत, असे आव्हानही दिले होते. त्याचवेळी शेट्टी यांचे जुने सहकारी आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला होता. खोत यांच्या या आरोपाचे शेट्टींनी आज उत्तर दिले.

आपण गेल्या ३० वर्षांपासून चळवळीत आहोत. बंद काळात रस्त्यावर ओतल्या जाणाऱ्या दुधात किती पाणी असते, हे मला शिकवू नये, असा टोला खोत यांनी शेट्टी यांना लगावला होता.

दरम्यान, मंगळवारी पुण्यात हडपसर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला. कालही सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतले होते. काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा त्यामागे हेतू होता.