कराड : आगाशिव डोंगर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने संपूर्ण परिसर स्वच्छ अन् हिरवागार असा नयनरम्य बनला असून, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पक्षीतीर्थ अन् जखिणवाडी, मलकापूर परिसरात उंबर, करंज, फणस, पिंपळ, चिंच या देशी व बहुउपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली. ‘निसर्ग समूह’ संस्थेच्या या उपक्रमात अनेक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी सहभागी झाल्याने यंदाची ही मोहीम अधिक प्रभावी ठरली.

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने कराडच्या निसर्ग समूहातर्फे विविध देशी वृक्षप्रजातींच्या रोपांचे रोपण करण्याच्या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. निसर्ग समूहाने यापूर्वी याच परिसरात लावलेल्या झाडांची वाढही उत्तम झाली असून, परिसरात पर्यावरणपूरक बदल दिसत आहेत. या झाडांच्या संगोपनासाठी आळी करून त्यांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली. यासोबतच सर्व झाडांना जीवामृत घालण्यात आले, जेणेकरून झाडांची वाढ सशक्त होईल व मातीतील सेंद्रिय घटक वाढून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

वनविभागाने तयार केलेल्या पक्षीतीर्थात आता स्वच्छ पाणीसाठा असून, या नैसर्गिक स्त्रोताचा लाभ स्थानिक जैवविविधतेला होत असल्याचे सुखद चित्र आहे. संस्थेने लावलेल्या चाफा, उंबर, बहावा, काटेसावर, पिंपळ, आवळा, बेल, करंज, फणस, चिंच आदी प्रजातींसह अनेक स्थानिक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हरित उपक्रमात शशिकला शिर्के, विक्रम झरेकर, सुरेश शिर्के, विजय वाडेकर, संग्राम कुंभार, मनोहर पवार, योगेश पाटील, दीपक रायबागी आदी निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. वृक्षारोपणानंतर वृक्षप्रेमींनी निसर्गाच्या सान्निध्यात एकत्रितपणे अल्पोपहाराचा आनंद घेत परस्परांमध्ये पर्यावरणविषयक चर्चा केली. ‘निसर्ग ग्रुप’चा हा उपक्रम सामाजिक भान आणि पर्यावरणप्रेमाचे उत्तम उदाहरण असून, स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करणारा ठरतो आहे.