NEET Paper Leak CBI Investigation Update: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. पुण्यातून ताब्यात घेतलीली एक ब्युटिशियन (सौंदर्यतज्ज्ञ) या संपूर्ण रॅकेटमधील मुख्य दुवा असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासात उघड झाले आहे. विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी शिक्षक शोधून देणे, शाळांमधील मोठ्या शिक्षकांशी संपर्क साधणे आणि या बदल्यात लाखो रुपयांचे कमिशन घेणे, अशा कामांमधून या महिलेने पेपर लीकचे मोठे जाळे विणल्याचे समोर आले आहे.

पार्लर ते पेपरफुट: ‘असा’ रचला गेला पेपरफुटीचा कट

मनीषा वाघमारे हिला कुठूनतरी सुगावा लागला की मनीषा मांधरे ही नीटचे पेपर सेट करणाऱ्या कमिटीमध्ये आहे. वाघमारेने तातडीने मांधरेची भेट घेऊन पेपर लीक करण्याचा कट रचला. या कटामध्ये त्यांनी निवृत्त शिक्षक प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी यांनाही सामील करून घेतले. ब्युटी पार्लरच्या व्यवसायामुळे वाघमारेचा अनेक पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संपर्क येत असे. शिकवणी लावून देण्याच्या बहाण्याने तिने गरजू आणि श्रीमंत विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. एका विद्यार्थ्याकडून पेपर देण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांचा सौदा ठरवला गेला होता. या १० लाख रुपयांमधून वाघमारे, मांधरे आणि कुलकर्णी हे आपापसात अडीच ते तीन लाख रुपये वाटून घेणार होते.

थेट ‘NTA’ च्या पॅनेलवरूनच पेपर लीक?

सीबीआयने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मांधरे ही ‘एनटीए’च्या (NTA) अधिकृत प्रश्नपत्रिका समितीमध्ये तज्ज्ञ म्हणून कार्यरत होती. त्यामुळे तिच्याकडे ‘नीट’ परीक्षेच्या वनस्पतिशास्त्र (Botany) आणि प्राणिशास्त्र (Zoology) या दोन्ही विषयांच्या अंतिम प्रश्नपत्रिकांची संपूर्ण माहिती आणि प्रवेश होता. या पदाचा गैरवापर करून मांधरे हिने अफाट पैशांच्या मोहापायी ही गुप्त माहिती आणि प्रश्नपत्रिका काही निवडक विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच पुरवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

नाशिक आणि जयपूर कनेक्शन

मनीषा वाघमारेने तिचे जुने मित्र धनंजय लोखंडे यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये समुपदेशनाचा (Counselling) व्यवसाय करणाऱ्या शुभम खैरनार याच्याशी संपर्क साधला. वाघमारेकडून मिळालेला पेपर लोखंडेने खैरनारला दिला. खैरनारने तो पेपर ‘पीडीएफ’ (PDF) स्वरूपात गुरुग्रामच्या यश यादवला आणि पुढे जयपूरमधील हस्तकांना पाठवला. गेल्या मंगळवारी परीक्षा रद्द झाल्यानंतर काही तासांतच शुभम खैरनारला अटक करण्यात आली होती.

सीबीआयचा कोर्टात मोठा दावा: “हे तर हिमनगाचे टोक!”

रविवारच्या सुनावणीदरम्यान सीबीआयने कोर्टाला सांगितले की, “हा केवळ एका पेपर लीकचा गुन्हा नसून, यामागे एक फार मोठे संघटित रॅकेट (Organized Crime Syndicate) कार्यरत आहे. अनेक आरोपींची ओळख पटवणे आणि त्यांना अटक करणे अजून बाकी आहे.” तपास अजून प्राथमिक आणि अत्यंत संवेदनशील टप्प्यावर असल्याने मनीषा मांधरेची १४ दिवसांची कोठडी मिळणे आवश्यक होते, जी न्यायालयाने मंजूर केली.

बचाव पक्षाचा युक्तिवाद

दुसरीकडे, आरोपी मांधरे यांच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, “मांधरे यांचे वय ५७ वर्षे असून त्या एक व्याख्यात्या आहेत. त्या तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याने त्यांना पोलीस कोठडीची गरज नाही.” मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य केली.या पुण्याच्या ‘ब्युटी पार्लर कनेक्शन’मुळे आता देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात महाराष्ट्रातून आणखी कोणाकोणाची नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.