‘लोकसत्ता- वसई-विरार’च्या प्रकाशनानिमित्त परिसंवादात मान्यवरांचा सूर
नांगर आणि नागर संस्कृती एकत्र नांदत असल्याने झालेल्या संघर्षांतून वसईत अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे या समस्या सोडवताना कोणत्याही एका गटाचा विकास न होता वसईचा शाश्वत विकासच झाला पाहिजे, असे परखड मत सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले आहे.
‘लोकसत्ता’तर्फे नुकतेच ‘लोकसत्ता- वसई-विरार’ या नव्या सहदैनिकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्त रविवारी वसईत ‘आपण आणि विकास’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिब्रिटो यांच्यासह महिला सक्षमीकरण कार्यकर्त्यां जयश्री सामंत, जागरूक नागरिक संघटनेचे चिन्मय गव्हाणकर तसेच वसई-विरार महापालिकेचे सहायक आयुक्त राजेंद्र पाटील या वेळी उपस्थित होते.
झपाटय़ाने वाढणाऱ्या वसईच्या समस्या या मान्यवरांनी याप्रसंगी पोटतिडकीने मांडल्या.
दिब्रिटो म्हणाले, आम्ही विकासाच्या आड नाही, शहरांच्या रचनेत नागरिकांचाही सहभाग असायलाच हवा. त्यामुळे पोर्तुगीजांनी सम्राज्ञी शहर म्हणून गौरविलेल्या वसईचा लौकिक सर्वाच्या सहभागातून तसाच टिकला पाहिजे, अशी अपेक्षा दिब्रिटो यांनी या वेळी व्यक्त केली.
समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) अधिक काळ गुंतत असल्याबद्दल आजच्या तरुणाईची हेटाळणी केली जाते. आजची युवा पिढी समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या मन:स्थितीत नसली तरी समाज माध्यमांतून आपल्या परीने या चळवळींना ते अप्रत्यक्षपणे साथ देत असल्याचे युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्मय गव्हाणकर यांनी सांगितले. कार्यकर्त्यां जयश्री सामंत म्हणाल्या की, नायगाव रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल, वसई खाडीवरील वाहतुकीसाठी पूल, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वसईतील बावखळांची स्वच्छता आदी समस्यांची पूर्तता व्हायला हवी. तसेच वसईत रिसॉर्ट संस्कृतीही वाढत आहे.
शहरांनाही स्वत:चा चेहरा, ओळख, आत्मा असतो. जगाचा इतिहास हा शहरांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. त्यामुळे शहरांनाही महत्त्व आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. मात्र शहरात राहूनही आपली शहराशी बांधीलकी नाही, अशी खंत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.

वसई दिसते तेवढी वाईट नसली तरी सार्वजनिक क्षेत्रातील दर्जेदार आरोग्य, प्राथमिक तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा, पाळणाघरे, रोजगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सुटायला हव्यात. त्यासाठी तरुणाई नेहमीच आघाडीवर राहील. समाजमाध्यमांचा त्यासाठी वापर केला जाईल.
-चिन्मय गव्हाणकर

पाणी हा जागतिक स्वरूपाचा प्रश्न असून, यावरून संघर्ष सुरू असले तरी वसईतील पाण्याची समस्या अधिक गंभीर आहे. तालुक्यातील विहिरींमधून होणाऱ्या बेसुमार पाणी उपशामुळे अपरिमित हानी होत असून येथील पाणीही दूषित होत आहे. शुद्ध पाणी हा येथील नागरिकांचा हक्क आहे.
– फ्रान्सिस दिब्रिटो

वसई-विरार शहरांचा विकास आराखडा तयार करताना वाढत्या लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला नाही. इमारती उभ्या राहत असताना त्यात राहायला येणाऱ्या नागरिकांना कोणकोणत्या सुविधा हव्यात याचा विचार राज्यकर्त्यांनी केलेला नाही.
– जयश्री सामंत