राज्यातील ३५९ धरणांच्या दुरुस्तीची गरज

राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेसाठी ही संघटना तपासणी करून त्रुटींवर उपाय सुचवते.

|| अनिकेत साठे
नाशिक : राज्यातील ११६ मोठ्या आणि २४३ मध्यम अशा एकूण ३५९ धरणांमध्ये तातडीने दुरुस्तीची गरज आहे. यात पुणे आणि कोकण विभागांतील धरणांचा प्रामुख्याने त्यात समावेश आहे. असे असले तरी एकाही धरणात गंभीर स्वरूपाचे दोष आणि त्रुटी नसल्याचा दावा धरण सुरक्षितता संघटनेने केला आहे.

राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेसाठी ही संघटना तपासणी करून त्रुटींवर उपाय सुचवते. दरवर्षी हे काम होत असले तरी धरणांतील त्रुटी, दोष मात्र कायम असल्याचे दिसून येते. धरण दरवाजे, भिंतीतून गळती, दरवाजातून पाणी बाहेर पडणाऱ्या ठिकाणी खडकांची झीज, अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची कार्यान्वित असणारी व्यवस्था, दरवाजा यंत्रणेतील दोष, माती भराव संकल्पित काटछेदानुसार नसणे, पाण्याचा दाब-भूगर्भातील हालचालींचे मापन करणारी बंद पडलेली उपकरणे आदी समस्यांना धरणे तोंड देत आहेत. सुरक्षितता संघटना समस्यांची तीन गटांत वर्गवारी करते. थेट धरणाला धोका पोहोचेल अशा गटात एकही धरण नाही. असे दोष जे तातडीने दूर करण्याची गरज आहे अशा गटात ३५९ मोठ्या-मध्यम धरणांचा समावेश आहे. याशिवाय किरकोळ त्रुटी असलेल्या धरणांची संख्या १२७४ आहे. यात २५७ मोठी तर १०१७ मध्यम धरणे आहेत.

तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असणारी सर्वाधिक १२५ धरणे पुणे विभागातील असून सर्वात कमी २२ धरणे नागपूर विभागातील आहेत. कोकण विभागातील ८१, अमरावती ४८, नाशिक ४७, औरंगाबाद ३६ धरणांना त्वरेने समस्यामुक्त करण्याची गरज आहे. या त्रुटींकडे वेळीच लक्ष न दिल्यास कालांतराने त्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात. राज्यातील जवळपास ४१ धरणांची बांधणी होऊन १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे संघटना विशेष लक्ष देत आहे.

मोठी-मध्यम १३२५ धरणे

राज्यात ३० मीटरहून अधिक उंची असणारे २५७  तर १५ ते ३० मीटर दरम्यान उंची असलेली १०१७ अशी एकूण १२६६ धरणे जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहेत. याशिवाय खासगी कंपन्या, महानगरपालिकांची मोठी १८ आणि मध्यम ३३ अशा ५१ धरणांच्या तपासणीचे काम धरण सुरक्षितता संघटना करते. राज्यात मोठी २७५ आणि मध्यम १०५० अशी एकूण १३२५ धरणे आहेत. दुरुस्तीची गरज असणाऱ्या यादीत १३ मोठी आणि १८ मध्यम अशा ३१ खासगी धरणांचाही अंतर्भाव आहे.

राज्यातील सर्व धरणे सुरक्षित

राज्यातील एकाही मोठ्या आणि मध्यम धरणात गंभीर स्वरूपाचे दोष वा त्रुटी नाहीत. एखाद्या धरणाने हानी होईल, अशी स्थिती नाही. सर्व धरणे सुरक्षित आहेत. १०० वर्षे पूर्ण झालेल्या धरणांकडे विशेषत्वाने लक्ष  देण्यात येत आहे. त्यासाठी एक वर्षाआड त्यांच्या तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे.

– यशवंतराव भदाणे (प्रमुख, धरण सुरक्षितता संघटना, नाशिक)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Need to repair 359 dams in the state akp