मुंबई: शिवसेना फुटी नंतर सोबत येणाऱ्या माजी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांना शिंदेंवरील “एकनिष्टचे” बक्षिस म्हणून पुन्हा विधान परिषद आमदारकी मिळणार आहे तर शेतकरी व दिव्यांग साठी काम करणारी प्रहार संघटना शिवसेना शिंदे पक्षातविलीन करण्याच्या अटीवर बच्चू कडू यांना विधान परिषदेत संधी देण्यात येणार आहे. आज सकाळी या दोन्ही उमेदवारांची नावे शिंदे यांच्या संमतीने पक्ष सचिव जाहीर करतील.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागां पैकी महायुतीच्या वाट्याला येणाऱ्या आठ जागांपैकी दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाने पक्ष फुटीनंतर ठाकरे पक्षाला सोडचिट्टी देऊन शिंदे पक्षात आल्याबद्दल उमेदवारी दिली. तर प्रहार पक्ष संघटना शिवसेनेत विलीन करण्याच्या अटीवर अध्यक्ष बच्चू कडू यांना विधानपरिषद मिळाली आहे. नऊ जागांसाठी १२ जून रोजी निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे ऐवजी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे पण ही नाराजी दूर करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होणार आहे.

विधासभेच्या आमदारांच्या संख्याबळानुसार ९ जागांपैकी पाच जागा भाजप, दोन जागा शिवसेना शिंदे पक्ष, एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप ने आपले उमेदवार मंगळवारी जाहीर केले.शिवसेना शिंदे पक्षाने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा उमेदवारी दिली.

दुसऱ्या जागेसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रात्री उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन येथे भेट घेतली. कडू यांनी त्यांची संघटना शिवसेना शिंदे पक्षात सामील करण्याची अट मान्य केल्याचे समजते. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज ३० एप्रिल ही शेवटची मुदत आहे. एका जागेसाठी २९ आमदारांचे संख्याबळ लागणार आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे संख्याबळ ६० आमदारांचे असल्याने दोन उमदेवार सहज निवडून येऊ शकतात.