Neelam Gorhe Cabinet Minister : ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या फायरब्रँन्ड नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. कॅबिनेटमध्ये अनेक महिला मंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. परंतु, शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री म्हणून नीलम गोऱ्हे यांना मान मिळालाय. यासंदर्भात त्यांनी स्वतःहून माहिती दिली. कॅबिनेट मंत्रीपदाची माहिती देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रत आलेली आहे. कॅबिनेट पदाचा दर्जा मला दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. महिलांना कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं आहे. पण शिवसेनेतील महिलेला कॅबिनेट मंत्रीपद मिळणारी मी पहिलीच व्यक्ती आहे, त्याबद्दल मला याबाबत मला फार आनंद वाटतोय." नीलम गोऱ्हे यांची राजकीय पार्श्वभूमी पेशाने डॉक्टर असलेल्या नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेतील फायर ब्रॅण्ड नेत्या म्हणतात. महिला आणि दलितांच्या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवरून त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू लावून धरली होती. महिला आघाडीची तोफ नीलम गोऱ्हे यांनी कायम धडाडत ठेवली. परंतु, काहीच दिवसांपूर्वी त्या शिंदे गटात सामील झाल्या, त्यामुळे त्यांचं उपसभापती पद धोक्यात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पक्षांतर केल्याचा दावा करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी विधान परिषदेत केली. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कायदेशीर बाजू स्पष्ट केली. त्यामुळे त्यांचं हे पद कायम राहिलं आहे. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नीलम गोऱ्हे या उपसभापती कशा झाल्या हे पाहूयात. हेही वाचा >> Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना मिळाला महत्त्वाचा दर्जा, म्हणाल्या, “शिवसेनेच्या पहिल्या महिला…” महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता नीलम गोऱ्हे यांनी १९७७ साली युवक क्रांती दलातून सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. परंतु, त्यांनी त्यांची चौकट केवळ महिला चळवळीपुरती मर्यादित ठेवली नाही. ऊसतोडणी कामगार, शोषित, मजूर, भूमीहीन दलित, मजुरांसाठीही त्यांनी चळवळ उभारली. ज्या काळात राजकारणात पुरुषी वातावरण होतं, त्या काळात नीलम गोऱ्हे यांनी आपली राजकीय कारकिर्द जोरात सुरू केली. त्यांनी लक्ष वेधलेल्या महिलांच्या प्रश्नांमुळे राजकारणाच्या पटलावर नवा अजेंडा निर्माण होत होता. महिलांचे प्रश्न सोडवण्याकरता समाजकारणासह राजकारणही गरजेचं असल्याचं त्यांना कळलं, म्हणून त्यांनी आपली राजकीय वाटचालही सुरू केली. महिलांचे प्रश्न, दलितांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी १९८७ साली रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला. राज्याच्या राजकारणात नीलम गोऱ्हेंचा झंझावात वाढत गेला. प्रखर महत्त्वाकांक्षा असलेलं निडर व्यक्तिमत्त्व नीलम गोऱ्हेंच्या रुपाने मिळत होतं. त्यातूनच, त्यांनी पुढे शिवसेनेची वाट निवडली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेना अशीच निडर आणि आक्रमक होती. त्यामुळे नीलम गोऱ्हेंच्या स्वभावाशी शिवसेनेचा स्वभाव जुळला. यातून नीलम गोऱ्हेंचं पक्षातील वर्चस्व वाढत गेलं. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न मांडले. शिवसेनेतील महिला आघाडी गोऱ्हेंनी मजबूत केली. गोऱ्हेंच्या कामाचा झंझावात पाहून त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं. २००२ साली त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्या. २००२ पासून विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांना २०१९ साली उपसभापती पदाची जबाबदारी मिळाली. २०१९ साली बिनविरोध निवड महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. काँग्रेसकडून जोगेंद्र कवाडे यांचं नाव चर्चेत होतं. परंतु, या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे, नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.