Maharashtra Politics Top 5 Statements: भोंदूबाबा अशोक खरात कधीच भेटले नसल्याचे विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तृप्ती देसाईंनी केलेल्या विविध आरोपांवर गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात याच्या नार्को टेस्टची मागणी करताना अनेक खळबळजनक दावे केले. तसेच, मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. भगवा कुर्ता घालून हिंदू होता येत नाही, अशा शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. याशिवाय अभिनेते शरद पोंक्षे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर केलेल्या वक्तव्याची चर्चाही दिवसभर झाली. जाणून घेऊन दिवसभरातील पाच महत्वाची आणि गाजलेली विधाने.

अशोक खरातला भेटले नाही – नीलम गोऱ्हे

आई-वडिलांनी केलेल्या संस्काराचे काटेकोर पालन करत आल्याचे सांगताना नीलम गोऱ्हे यांनी कोणत्याही भोंदूला भेटल्याच्या आरोपांचे खंडन केले. अशोक खरातला कधीच भेटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नीलम गोऱ्हे यांचे अशोक खरातसोबत चांगले संबंध होते तसेच, पाथर्डी येथील हॉटेलमध्ये भेटायला आला होता, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. याला गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पुणे महापालिकेत यश न मिळाल्याने काही असंतुष्ट घटक माझ्याविरोधात कारस्थान करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. “देवदेवता, अक्कलकोट स्वामी समर्थ, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर दत्त महाराज यांच्यावर अढळ माझी अढळ श्रद्धा आहे. महिलांची प्रगती आणि सामाजिक न्याय यावर काम केले आहे. या काळात राजकीय पद किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी मी कधीही भोंदूबाबाच्या दर्शनाला गेले नाही”, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या

अशोक खरातची नार्को चाचणी करा – वडेट्टीवार

“व्हिडीओ पुढे येत आहेत, ते ठराविक व्हिडीओच समोर येत आहेत. १००० च्या वर पुढे व्हिडिओ आहेत. पण १५० च व्हिडिओ समोर आले. ज्या महिला यात दिसत आहेत, त्यांच्या पतींवर कारवाई झाली पाहिजे. ते देखील दोषी आहे”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. “मंत्री, आमदार, शासकीय अधिकारी, आएएस, आयपीएस या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांबरोबर यांचीही चौकशी झाली पाहिजे. मी सातत्याने म्हणतोय की अनेकांच्या, मोठमोठ्या लोकांच्या बायका या खरातच्या ऑफिसमध्ये जात होत्या. प्रशासकीय अधिकारी बाहेर बसत अन् यांच्या बायका खरातच्या ऑफिसमध्ये जात”, असेही वडेट्टीवार म्हणाले. अशोक खरातच्या नार्को चाचणीची मागणी देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून दोशी रजेवर – फडणवीस

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरुन पोलिस अधीक्षक तुषार दोशी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निलंबनाचे दिलेले आदेश माघारी घेण्यात आले असले तरी दोशी यांची याप्रकरणी चौकशी सुरु आहे. दरम्यान, सध्या त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून दोशी यांनी रजेवर पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. तर, मंत्री शंभुराज देसाई यांनी चौकशी असल्यामुळे रजेवर जाण्यास सांगितले असेल, असे मत मांडले.

भगवा कुर्ता घालून हिंदू होता येत नाही – अमित ठाकरेंची नितेश राणेंवर टीका

भगवा कुर्ता घालून हिंदू होता येत नाही, अशा शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. “राणे यांनी सेना, काँग्रेस असा प्रवास करत स्वत:चा पक्ष काढला त्यानंतर भाजपात प्रवेश केला. आपला बॉस कोण आहे? याचा विचार त्यांनी करायला हवा. तसेच, हा तात्पुरता बॉस आहे. सत्ता बदलल्यानंतर बॉस देखील बदलणार आहे”, असे अमित ठाकरे म्हणाले. “भगवा कुर्ता घालून कोणी हिंदू होत नाही, हिंदुत्व डोक्यात आणि मनात असावे लागते”, असे अमित ठाकरे म्हणाले. सोलापूरमध्ये बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे माध्यमांशी बोलत होते. “गुन्हेगारांना पाठबळ देणारी सिस्टीम आज ना उद्या कोसळेलच, पण या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही”, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

तर अशा १० भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा करु शकतो – शरद पोंक्षे

संघ ही भाजपची आई आहे. मात्र, भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. रेशीमबाग येथील महर्ष व्यास सभागृहातील एका कार्यक्रमात ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर पोंक्षे बोलत होते. “गर्वाने म्हणा आम्ही हिंदू आहोत’, असे म्हणण्याची ताकद केवळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जाते. शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे”, असे पोंक्षे म्हणाले.