NEET Paper Leak CBI Investigation Update:‘नीट’परीक्षा पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रात आणखी खोलवर पसरल्याचे समोर येत आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि बीडनंतर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आपला मोर्चा नांदेडकडे वळवला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शुभम खैरनार याच्याशी संबंधित असलेल्या नांदेडमधील एका कुटुंबाची सीबीआयच्या पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.
‘गेस पेपर्स’साठी मोजले लाखो रुपये?
नाशिकमधून अटक करण्यात आलेला आरोपी शुभम खैरनार आणि नांदेडमधील एका कुटुंबाचे थेट कनेक्शन असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. नांदेडच्या विद्युत नगर भागात राहणाऱ्या या कुटुंबाने ‘नीट’ परीक्षेचे लीक झालेले कथित ‘गेस पेपर्स’ खरेदी केल्याचा संशय यंत्रणेला आहे. या कुटुंबातील दोन मुले यंदा नीट परीक्षेची तयारी करत होती. रविवार सकाळपासूनच सीबीआयचे पथक या कुटुंबाच्या घरी ठाण मांडून असून, सदस्यांची कसून चौकशी केली जात आहे.
दुसरीकडे, या रॅकेटचे मूळ शोधण्यासाठी सीबीआयच्या दुसऱ्या एका पथकाने आरोपी शुभम खैरनारच्या पुण्यातील कार्यालयावर छापेमारी केली. मध्यस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत लीक झालेला पेपर कसा पोहोचवला गेला, याचा शोध सीबीआय घेत आहे.
‘एनटीए’च्या पॅनलवरील महिला तज्ज्ञ सीबीआयच्या ताब्यात
या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे थेट ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) च्या अंतर्गत यंत्रणेपर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयने रविवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपी मनीषा गुरुनाथ मांढरे हिला हजर करून १४ दिवसांची कोठडी मागितली. मनीषा मांढरे ही ‘एनटीए’च्या तज्ज्ञ समितीची सदस्य होती आणि तिने परीक्षेदरम्यान अनुवादक (Translator) म्हणूनही काम केले होते.
सीबीआयचा कोर्टात मोठा दावा: “एनटीएची संपूर्ण परीक्षा पद्धतच सध्या तपासाच्या फेऱ्यात आहे. आरोपी मनीषा मांढरे हिने पेपर लीक करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे.”
संरक्षण पक्षाने या कोठडीला विरोध केला. मांढरे यांच्या घरातून कोणतीही जप्ती झालेली नाही आणि त्यांनी यापूर्वीच तपासात सहकार्य केले आहे, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. मांढरे हिला मथुरेतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले होते.
सरकारी अधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
शनिवारी सीबीआयच्या तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ‘एनटीए’शी संबंधित असलेल्या एका बड्या सरकारी अधिकाऱ्याची भूमिकाही आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. सीबीआयने कोर्टात सांगितले की, आरोपी मनीषा संजय वाघमारे आणि केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनी एनटीएच्या एका अधिकाऱ्यासोबत संगनमत करून २७ एप्रिल रोजीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळवल्या होत्या.
३ मे रोजी परीक्षा संपल्यानंतर पुराव्यांवर पाणी फिरवण्यासाठी केमिस्ट्रीच्या हाताने लिहिलेल्या प्रश्नपत्रिका नष्ट करण्यात आल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे.
पुण्यात भरत होते ‘स्पेशल कोचिंग’ क्लासेस!
एनटीएच्या पॅनलवर असल्याने आरोपी मनीषा मांढरेकडे बॉटनी आणि झूलॉजीच्या प्रश्नपत्रिकांची आधीच माहिती होती. याचा गैरफायदा घेत तिने पुढाकार घेऊन पुण्यात आपल्या राहत्या घरी काही निवडक विद्यार्थ्यांसाठी ‘स्पेशल कोचिंग’ घेतले होते. धक्कादायक बाब म्हणजे, या क्लासमध्ये तिने घेतलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष नीट परीक्षेतील प्रश्न तंतोतंत जुळणारे होते, असा दावा सीबीआयने केला आहे.
असाच प्रकार प्राध्यापक कुलकर्णी यानेही केल्याचे समोर आले आहे. कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर मानद तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या घरी घेतलेल्या गुप्त क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना जे प्रश्न आणि उत्तरे दिली, ती ३ मे रोजीच्या मुख्य परीक्षेशी ‘हबेहूब’ मॅच झाली. या एका सेशनसाठी विद्यार्थ्यांनी लाखो रुपये मोजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशभरात धाडसत्र: आतापर्यंत ९ जणांना बेड्या
गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात ६ ठिकाणी जोरदार छापे टाकले आहेत. या कारवाईत संशयित लॅपटॉप, बँक खात्यांचे स्टेटमेंट्स, मोबाईल फोन आणि अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या हायप्रोफाइल घोटाळ्यात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण ९ जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.
