NEET Re-Exam RCC Motegaonkar Schedule : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या आरसीसी शिकवणी वर्गाचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारी २ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ताब्यात घेतल्यापासून त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यांच्या मॉक टेस्टमधील सर्वाधिक प्रश्न नीट परीक्षेत विचारला गेल्याचा दावा या व्हिडिओंमधून केला जातोय. दरम्यान, नीट परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर एनटीएने ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले. पुनर्परिक्षा जाहीर केल्यानंतर मोटेगावकर यांनीही अभ्यासाचं नवं शेड्युल त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केलं होतं.
नीट पुनर्परीक्षेसाठी आरसीसीचं नवं शेड्युल
NEET UG ची पुनर्परीक्षा आता २१ जून रोजी होणार आहे. पेपरफुटीच्या प्रकारामुळे ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही नवीन तारीख जाहीर केली. नीट आणि जेईई परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी शिवराज मोटेगावकर यांचे आरसीसी शिकवणी वर्ग देशभरात प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी या कोचिंग क्लासचे विद्यार्थी आहेत. एनटीएने नवीन तारीख जाहीर करताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोटेगावकर यांनी एक नवी योजना आणली. त्यांनी त्यांची टॉप टेस्ट सीरिज सर्व विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर केलं.
याबाबत त्यांनी सोशल मिडिया व्हिडिओही शेअर केले होते. या व्हिडिओत त्यांनी म्हटलंय की, संपूर्ण महाराष्ट्रातून नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आरसीसीमधील टॉप टेस्ट सीरिज मोफत उपलब्ध असेल. तर वन शॉट व्हिडिओही ऑनलाईनरित्या उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे २१ मेपासून सुरू होणार होतं. मात्र, त्याआधीच त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू झाली आहे.
टीकाही अन् समर्थनही
दरम्यान, त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त वाऱ्यासारखं महाराष्ट्रभर पसरलं असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. तर, दुसरीकडे त्यांच्याकडे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि पालकांनी मात्र, त्यांच्या समर्थनार्थ कमेंट्स आणि पोस्ट्स केल्या आहेत. मोटेगावर यांनी कायम गरीब विद्यार्थ्यांचा आर्थिक भार उचलून त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केलं, असं काहींनी म्हटलंय तर काहींनी त्यांच्यावर खरपूस टीका करून मॉक टेस्टमधील प्रश्न परीक्षेत आल्याबद्दल जाबही विचारला आहे.
