मुंबई : नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने ती रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. पण भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर फोडणारे माफिया मोकाट सुटलेत, असा आरोप करताना या प्रकरणात राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांची हकालपट्टी करून अटक करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्ध सपकाळ यांनी केली आहे.

भाजपचे सरकार केंद्रात व अनेक राज्यांत आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरू आहे. भाजपा सरकारला एक परीक्षाही सुरळीत पार पाडता येत नाही अशी अवस्था झाली. ३ मे रोजी देशभर पार पडलेल्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली होती. मात्र, पेपरफुटीमुळे पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आल्याने सुमारे २२ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. नीट परिक्षा ही विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांशी निगडीत आहे. त्यामुळे पेपर रद्द होणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा आहे, असा संतापही सपकाळ यांनी व्यक्त केला.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा नीट परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप करतानाच नीट-युजी परीक्षेच्या २०२४ मध्येही पेपरफुटी झाली होती. सुरुवातीला सरकारने आरोप फेटाळला होता, पण बिहार आणि हजारीबाग येथे गैरप्रकार झाल्याचे प्रधान यांनी मान्य केले होते. दोषींवर कारवाईचे त्यांनी आश्वासन दिले होते, मात्र त्याचा काहीच परिणाम दिसत नाही, असेही सपकाळ म्हणाले. काँग्रेससह इतर पक्षांचे सरकार असले की भाजपा मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करते. पण २०१४ नंतर कितीही गंभीर घटना घडल्या तरी भाजपाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे उदाहरण दिसत नाही, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पेपर फुटीचे अनेक प्रकार झाले पण त्यावर कठोर कारवाई झाली नाही, असे सांगत भाजप सरकारचे अकार्यक्षम व कुचकामी प्रशासन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालत आहे. याबद्दल देशभरातील विद्यार्थी व पालक भाजपाच्या कुचकामी सरकारला माफ करणार नाहीत, असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला.