सोलापूरमध्ये सर्वच पातळ्यांवर उदासिनता

एजाज हुसेन मुजावर

kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…

सोलापूर : सोलापूरचे थोर मानवतावादी सुपुत्र डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचे राष्ट्रीय स्मारक अनेक वर्षांच्या धडपडीनंतर साकार होऊन १०-११ वर्षे झाली. परंतु हे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे होण्याऐवजी उलट धूळ खात पडून आहे. सोलापूर महापालिकेची उदासीनता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे त्यामागचे कारण आहे. एकीकडे डॉ. कोटणीस यांच्या सोलापूरसाठी चीन सरकार मुक्तहस्ते द्यायला तयार आहे. परंतु दृष्टिकोनच नसलेल्या सोलापूर महापालिकेला घ्यायला पदरच नाही, असे वेळोवेळी दिसून आले आहे.

अलिकडेच चिनी कौन्सिल जनरल काँग शियानहुइ यांनी मुंबईत डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूलची सोलापुरात उभारणी करण्याची घोषणा केली. याशिवाय चीनमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सोलापुरातील दोन विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचेही त्यांनी घोषित केले आहे. तद्नुषंगाने चिनी शिष्टमंडळाने सोलापुरात येऊन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. महापालिका प्रशासनाने लष्कर भागातील पालिकेची शाळा डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूलसाठी दत्तक देण्याचे ठरविले आहे. सुमारे २७०० विद्यार्थी संख्येच्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अद्ययावत शैक्षणिक सेवासुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी, गणित आणि शास्त्र विषयांचे अवलोकन होणे तुलनेत कठीण असते. चीनमध्ये यासाठी कोणत्या प्रकारचे शैक्षणिक प्रयोग राबविले जातात, याची माहिती घेऊन ते प्रयोगही सोलापुरात डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूलमध्ये आयात करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करणेही अपेक्षित आहे. डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल आणि दरवर्षी सोलापूरच्या दोन विद्यार्थ्यांना चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची चीन सरकारच्या योजनेचे स्वागत करायला हवे. परंतु दवाखाना दत्तक म्हणून घेण्यासाठी दिलेला प्रस्ताव लगेचच मंजूर होणे शक्य नाही. तोपर्यंत डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल आणि चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी सोलापूरच्या दोन विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती प्राधान्यक्रमाने पदरात पाडून घेणे गरजेचे आहे.

यापूर्वी चीन सरकारने डॉ. कोटणीस यांच्या मूळ जन्मगावी सोलापुरात उचित स्मारक उभारण्यासाठी मोठी देणगी जाहीर केली होती. याशिवाय चीनमध्ये ज्या ठिकाणी डॉ. कोटणीस यांची समाधी तथा स्मारकस्थळ आहे, त्या शी चा च्वांग आणि सोलापूर या दोन्ही शहरांमध्ये भगिनी शहरे म्हणून १९९० साली तत्कालीन महापौर मुरलीधर पात्रे आणि चिनी शिष्टमंडळात करार झाला होता. हा करार तसाच पुढे धूळ खात पडला. पुढे तत्कालीन महापौर नलिनी चंदेले यांच्या कार्यकाळात डॉ. कोटणीस स्मारक उभारण्यासाठी चालना मिळाली. तसे शी चा च्वांग आणि सोलापूरदरम्यान भगिनी शहर म्हणून पूर्वी झालेल्या करारावरील धूळ झटकण्यात आली. शी चा च्वांग व सोलापूर भगिनी करारानुसार दोन्ही शहरांमध्ये व्यापार आणि उद्योगासह कला, नाटय़, संस्कृती, वैद्यकीय आदी क्षेत्रात आदानप्रदान करण्याचे ठरले होते.

 तरीही पुढे त्यादृष्टीने कोणताही पाठपुरावा न झाल्यामुळे भगिनी शहरांचा करार आजतागायत कृतीत आला नाही. चीन सरकारने जाहीर केलेल्या देणगीची रक्कम मिळण्यासाठी परदेशी चलन नियंत्रण कायद्यानुसार (फेरा अ‍ॅक्ट) केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी मिळविणे तेवढेच गरजेचे होते. त्या वेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे सोलापूरचे वजनदार लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळात होते. त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता तर परदेशी चलन नियंत्रण कायद्यानुसार सोलापूर महापालिकेला सहजपणे परवानगी मिळू शकली असती.

भैय्या चौकात डॉ. कोटणीस यांच्या मूळ मालकीच्या इमारतीमध्ये सततच्या पाठपुराव्यानंतर त्यांचे स्मारक उभारले आहे. या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. परंतु राष्ट्रीय दर्जा मिळणे तर दूरच राहिले, २०११ साली लोकार्पण झालेले डॉ. कोटणीस स्मारक  बंद अवस्थेत दिसते.  त्यासाठी एखाद्या माहीतगार जाणकार व्यक्तीची नेमणूक होणे अपेक्षित आहे. या स्मारकात प्रशस्त चार खोल्या आहेत. चिनी वैद्यकीय सेवाही तेथे उपलब्ध होऊ शकते. परंतु सार्वत्रिक उदासीनता असेल तर  काय होणार?

– रवींद्र मोकाशी, सदस्य, डॉ. कोटणीस स्मारक समिती