Nepal Floods Maharashtra Pilgrims Rescue : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे काठमांडूमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १०० यात्रेकरूंची बिहार सरकारने सुरक्षित सुटका केली. यात्रेकरूंना शनिवारी रेल्वेने त्यांच्या राज्याकडे रवाना करण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य सचिव तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिवांच्या देखरेखीखाली ही बचावमोहीम राबवण्यात आली. याबद्दल सविस्तर वृत्त एएनआयने दिले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर २८ ऑगस्ट रोजी सीतामढी जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत नेपाळ सीमेवरून यात्रेकरूंना सुरक्षितपणे सीतामढीत आणले. तेथे त्यांच्या राहण्याची तसेच जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली. यानंतर २९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे अडीच वाजता यात्रेकरूंना सीतामढीहून पाटण्यात आणण्यात आले. पाटणा जिल्हा प्रशासनाने ओपी साह सामुदायिक भवनामध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली. रात्रीच्या वेळी त्यांना अन्न, निवास आणि वैद्यकीय तपासणीसह आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या.
रेल्वेने महाराष्ट्राकडे रवाना; दोन अतिरिक्त डबे जोडले
यात्रेकरूंना महाराष्ट्रात परत पाठवण्यासाठी बिहार सरकारने नवी दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांशी समन्वय साधला. त्यानंतर पाटणा-पुर्णा एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबे जोडण्यात आले, जेणेकरून सर्व यात्रेकरूंना सुरक्षितपणे प्रवास करता येईल. शनिवारी सकाळी सुमारे साडेसात वाजता यात्रेकरू पाटण्यातून रेल्वेने महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले.
नेपाळमधील पुराच्या संकटातून सुखरूप बाहेर काढून सुरक्षितपणे घरी पाठवल्याबद्दल यात्रेकरूंनी बिहार सरकार तसेच सीतामढी आणि पाटणा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. प्रशासनाने दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि समन्वयित मदतकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नेपाळमधील पूरग्रस्त भागांतून अद्याप ३२० भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली. नेपाळमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही शोध आणि बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत मृतांचा एकूण आकडा ६२६ वर पोहोचला आहे. जवळपास १,००० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर बेपत्ता असलेल्या लोकांमध्ये किमान ५१७ परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
शोध व बचावकार्यामध्ये ७,४५१ सुरक्षा सैनिक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नेपाळ लष्कराच्या २,३९१ सैनिकांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
