मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सागा येथून ४१ जण आज परतले असून,१०६ जण नागपूरला उद्या पहाटे साडेचार वाजता पोहोचतील. जवळपास १४३ नागरिक राज्यात यशस्वी व सुरक्षितरित्या परतण्याच्या मार्गावर असून, नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सहाय्यता व मदतकार्य समन्वय साधला जात आहे.
महाराष्ट्रातील ४५ पर्यटकांचा भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश
राज्यातील ४५ जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपने आज भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक , पुणे , मुंबई व अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळ येथे गेले होते. महापुराच्या घटनेच्या कालावधीत हे नागरिक चितवन येथे होते. आज काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने नेपाळमधील लुंबिनी मार्गे त्यांना आणण्यात येत असून आज अयोध्या पोहोचल्यानंतर पुढील नियोजन शासनाच्या सूचनेनुसार केले जाणार आहे.
राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सूचनानुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८ नागरिकांशी संपर्क झाला आहे. त्यासह अजून १४९ भारतीय पर्यटकांनी चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश केला आहे. यामध्ये काही महाराष्ट्रातील पर्यटक असतील तर तेही लवकरच राज्यात परततील, असेही फडणवीस म्हणाले.
