Nepal floods Mumbai pilgrims return news updates : गेल्या दोन दिवसांपासून एका फोन कॉलची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांसाठी शनिवारी संध्याकाळी अखेर दिलासादायक क्षण आला. कैलास-मानसरोवर यात्रा पूर्ण केल्यानंतर तिबेट आणि नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील ४१ यात्रेकरू शनिवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप दाखल झाले. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मोठी हानी झाली असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाबद्दल माझ्या मनात कृतज्ञता

“गेल्या ४८ तासांपासून मी सतत चिंता आणि भीतीच्या अवस्थेत होतो. पण अखेर माझ्या पत्नीला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मला मोठा दिलासा मिळाला. राज्य सरकारच्या यंत्रणा आणि परराष्ट्र मंत्रालयाबद्दल माझ्या मनात केवळ कृतज्ञता आहे”, असं बोरिवलीचे रहिवासी सुबोध साठे यांनी सांगितलं. त्यांची पत्नी शमा साठे या सुखरूप परतलेल्या यात्रेकरूंमध्ये होत्या. इंडियन एक्स्प्रेसने मुंबईत परतलेल्या पर्यटकांशी संवाद साधला.

सुबोध साठे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीच्या प्रवासात झालेल्या एका विलंबामुळे त्या महापुराच्या सर्वाधिक भीषण तडाख्यापासून वाचल्या. एका सहप्रवाशाच्या तिकिटाशी संबंधित समस्येमुळे शमा यांचा प्रवास लांबला आणि त्यामुळे त्या पूरग्रस्त भागात अडकण्यापासून वाचल्या.

नेपाळला गेले अन् आजारी पडले

पुणे विभागाच्या महसूल आयुक्त स्मिता पवार या तीन कुटुंबीयांसह यात्रेला गेल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या आणि त्यांच्या भावजय योगिनी पाटील आजारी पडल्या. त्यांचा ऑक्सिजन स्तर झपाट्याने कमी होत असताना पवार यांना हायपॉक्सिया झाला आणि त्यांच्या शरीराचा रंग निळसर-काळा पडू लागला. “ज्या दिवशी पूर आला, त्याच दिवशी आम्हाला सीमेपलीकडे जायचं होतं. मात्र, आम्हाला रुग्णालयात जावं लागल्याने आमचा प्रवास थांबला”, असं योगिनी पाटील यांनी सांगितलं. जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या नेतृत्वाखाली प्रमोद केणे यांच्या नेतृत्वाखाली हा यात्रेकरूंचा गट गेला होता. या गटात मुंबई महानगर प्रदेशासह पुणे आणि कर्नाटकातील यात्रेकरूंचा समावेश होता.

कैलास-मानसरोवर यात्रा पूर्ण केल्यानंतर या यात्रेकरूंचा मोठा गट तिबेटमधील सागा येथे अडकला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी शुक्रवारी पहाटे न्यालम चेकपोस्ट ओलांडून काठमांडूच्या दिशेने प्रवास केला. परतलेल्या यात्रेकरूंमध्ये कर्नाटकातील हुबळी येथील ७० वर्षीय वर्षा क्युरी यांचाही समावेश आहे. त्या १६ ऑगस्ट रोजी नेपाळला रवाना झाल्या होत्या. मात्र, पूर आल्यानंतर त्या तिबेटमध्ये अडकल्या.

पूर आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर कुटुंबीयांना त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. त्यांचा भाचा जयेश गोर यांनी सांगितले, “पूर आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून आम्ही माझ्या आत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर काही तासांनी, दुपारी साडेतीनच्या सुमारास आमचा त्यांच्याशी संपर्क झाला.” यानंतर क्युरी यांनी त्या सुरक्षित असून पुराचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचं नातेवाईकांना कळवले. या संकटानंतरही काही यात्रेकरूंची श्रद्धा मात्र कायम आहे.

ही तर देवाचीच इच्छा

“ही देवाची इच्छा होती; मात्र देवानेच आम्हाला वाचवलं, असा आमचा विश्वास आहे. आमची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही”, असं पुण्यातील ६५ वर्षीय हेमलता बोर्से यांनी सांगितलं. नेपाळला जाण्याची ही बोर्से यांची तिसरी वेळ होती. एवढा भीषण अनुभव आल्यानंतरही पुन्हा नेपाळला जाण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितलं. मुंबईत सुखरूप पोहोचलेल्या यात्रेकरूंमध्ये ७२ वर्षीय निवृत्त न्यायालयीन निबंधक श्रीकांत पाटील यांचाही समावेश आहे. ते आपल्या मुलीसोबत गिरनार गटात सहभागी झाले होते.

दरम्यान, नेपाळ आणि तिबेटमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत अहवालानुसार, नेपाळमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ४०४ हून अधिक नागरिक सुरक्षित आहेत. यापैकी ३३८ जणांशी प्रशासनाने संपर्क साधून त्यांना ट्रेस केलं आहे.

याशिवाय पुणे, मुंबई, अहिल्यानगर आणि महाराष्ट्रातील इतर भागांतील ४५ पर्यटक नेपाळमधील चितवन येथे अडकल्यानंतर भारतीय हद्दीत दाखल झाले आहेत. हे पर्यटक अहिल्यानगरस्थित एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत प्रवास करत होते. काठमांडूमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील आणखी १०६ पर्यटक ३० ऑगस्टच्या पहाटे बिहारमार्गे नागपूरला पोहोचले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, त्यांनी सुरक्षितपणे पाटण्यापर्यंत प्रवास केला आणि त्यानंतर महाराष्ट्रात परतले. परराष्ट्र मंत्रालयाने तिबेटमध्ये अडकलेल्या आणि सुखरूपपणे नेपाळमध्ये दाखल झालेल्या १४९ भारतीय नागरिकांची यादीही जाहीर केली आहे.