अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळमध्ये पर्यटन व देवदर्शनासाठी गेलेले ३७ नागरिक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजीच्या महापूराच्या तडाखा बसला. त्यामुळे आलेल्या जलप्रलयामुळे मोठी जिवीत आणि वित्तहानी झाली. या घटनेमुळे भारतातून नेपाळ आणि तिबेट सिमेवर गेलेल्या आणि संपर्कक्षेत्राबाहेर असलेल्या पर्यटकांबाबत चिंता व्यक्त केली जात होती. रायगड जिल्ह्यातून ३७ जणांना एक समुह नेपाळ आणि कैलाश मान सरोवर यात्रेसाठी गेला होता. हा समुह संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने पर्यटकांचे नातेवाईक धास्तावले होते. मात्र आता या समुहाबाबत महत्वाची माहितती समोर आली आहे. या समूहातील नागरिकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहे.
नागरिकांशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सद्य:स्थितीबाबत नियमितपणे माहिती घेतली जात आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत हे सर्व नागरिक सागा (चीन) येथे सुरक्षितपणे वास्तव्यास होते, नेपाळ प्रशासनाकडून देखील त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नेपाळ प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे रायगड येथे परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या रायगडमधील अलिबाग येथील नातेवाईकांशीही जिल्हा प्रशासनाचा संपर्क असून, त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार समूहातील सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेपाळमधील सद्य:स्थितीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ३७ नागरिक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाबाबतही जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते समन्वय व देखरेख ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
सर्वजण तिबेट कडून काठमांडूत दाखल
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा ३७ जून अडकून पडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्वांना खाजगी बसने सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे आणण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ते काठमांडू येथे दाखल झाले असून आज सकाळी विमानाने ते मायदेशी परतणार आहेत. अशी माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली आहे.
