नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकांचा संपर्क तुटला असून राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यातील सुमारे २९० हून अधिक पर्यटक नेपाळच्या विविध भागांत अडकले आहेत. यातच ठाण्यातील एका ज्येष्ठ दांपत्याशी गेल्या काही दिवसांपासून कोणताही संपर्क न झाल्याने त्यांचे कुटुंबीय अत्यंत हवालदिल झाले आहेत.

६० हून अधिक भाविक बेपत्ता; प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल्स’ आणि नेपाळमधील ‘रिचा टूर अँड ट्रॅव्हल्स’ या संस्थांच्या माध्यमातून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या ६० हून अधिक महाराष्ट्रीयन भाविकांचा सध्या शोध लागलेला नाही.

राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये महाराष्ट्रातील तब्बल ३९५ नागरिक अडकल्याची निश्चित माहिती मिळाली होती. त्यांपैकी १०५ पर्यटक सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत; तर उर्वरित २९० पर्यटकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असले, तरी नेपाळमधील विविध दुर्गम भागांत अडकलेले आहेत.

जोशी दांपत्य बेपत्ता

दुर्घटनेनंतर कैलाश-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील अनेक भाविकांचा अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. यामध्ये ठाण्यातील जोशी दांपत्याचाही समावेश असून, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

ठाण्यात राहणारे समीर जोशी आणि अपर्णा जोशी हे दांपत्य कैलाश-मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेले होते. दोघांचाही हा पहिलाच नेपाळ दौरा होता. समीर यांचे बंधू सचिन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास समीर यांच्याशी शेवटचा संवाद झाला होता. त्यांनी कुटुंबाला एक फोटो पाठवला होता आणि त्याच वेळी व्हॉट्सॲप स्टेटसही अपडेट केले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येत असून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पहिल्यांदाच नेपाळला गेलेले ठाण्यातील पाटणकर दांपत्य संपर्काबाहेर

बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये ठाण्यातील रहिवासी आणि निवृत्त आयटी सल्लागार रेखा व सतीश पाटणकर या दांपत्याचा समावेश आहे. सतीश यांचे बंधू संजय पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८:३० वाजता दोन्ही देशांच्या सीमेवर ‘इमिग्रेशन’ प्रक्रियेदरम्यान त्यांचा शेवटचा फोन आला होता. “आम्ही गुरुवारी सीमा ओलांडून पुढे जाऊ,” असे त्यांनी घरी सांगितले होते; मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

संजय यांनी सांगितले की, “बुधवारी दुपारी नेपाळमध्ये पूर आल्याची माहिती आम्हाला मिळाली, पण परिस्थिती इतकी गंभीर असेल याची सुरुवातीला कल्पना नव्हती. मात्र टिमुरे भागातून पर्यटक बेपत्ता झाल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर आम्ही तातडीने भाऊ आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला.”

अमेरिकेतून मुलांचे प्रयत्न; सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन

बेपत्ता पाटणकर दांपत्याची मुले अपूर्वा आणि अंकुर सध्या अमेरिकेत असून, तेथूनच आपल्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ट्रॅव्हल ऑपरेटर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संपूर्ण परिसर पुरामुळे उद्ध्वस्त झाला असून सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

या भीषण घटनेनंतर बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाइकांनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बेपत्ता नातेवाइकांचे फोटो व माहिती शेअर करून मदतीचे आवाहन केले जात आहे. याशिवाय ‘हिल्स अँड ट्रेल्स’ ग्रुपमधील २७ बेपत्ता सदस्यांच्या कुटुंबीयांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे माहितीची देवाणघेवाण आणि बचावकार्यासाठी समन्वय साधला जात आहे.